Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंगार पेरताना....अंगाची लाही... तरीही सर तुम्ही थांबला नाही दंडवत!

 अंगार पेरताना....अंगाची लाही... तरीही सर तुम्ही थांबला नाही दंडवत!


तसंही प्रा नितीन बानगुडे पाटील म्हणजे सिर्फ नाम ही काफी है.... सरांना जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा त्यांचे एक नवे दर्शन घडते. आजचे दर्शन यापूर्वीच्या भेटी हून खूप वेगळे होते.... दीड तास छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य उलगडून दाखवताना सर घामाने चिंब भिजले होते. सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौकाने भारतभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा अनुभवल्या आहेत. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत तासन् तास बसून साथ दिलेली आहे. आज स्टेशन चौकाने नितीन बानुगडे पाटील नावाच्या एका आधुनिक धृव तार्‍याचा नव्याने अनुभव घेतला. 

आमच्या नवहिंद प्रतिष्ठानच्या शंभुराजे जन्मोत्सव समारंभात सर बोलत होते, शब्दांचे अंगार शिलगत होते. समोर स्तब्ध झालेला समुदाय होता. कानात प्राण आणून शंभूराजांची गाथा ऐकत होता....  दीड तास सर बोलत होते. धारदार शब्द लोकांच्या मनाचे वेध घेत होते. कधी डोळ्यात अश्रू तर कधी टाळ्यांचा कडकडाट,  सुरु होता. मधल्या काळात मुखात पाण्याचा एक थेंबही न घेता सर सलग बोलत होते. संपूर्ण अंग घामाने चिंब भिजलेले होते. पण भाषणाची लय कुठे सुटली नव्हती. माणसंही खुर्चीला खिळून बसली होती! अलीकडच्या काळात इतके एकरूप होऊन वक्त्यांनी बोलणे आणि श्रोत्यांनी ऐकणे अनुभवायला येत नाही. 

 अशा काळात आम्ही आज चमत्कार पाहिला. ही शक्तीच वेगळी आहे.  त्या शक्तीची अनुभूती आज नितीन बानगुडे पाटील सरांच्या भाषणातून आली. यांचे भाषण घेण्याचा सगळ्यात मोठा आग्रह शंभूचा होता. दोन वर्षापूर्वी सरांनी शंभू राजांचा जन्मोत्सव सांगलीत सुरू करण्याचा आदेश त्याला दिला होता. कोरोनामुळे संकल्प दोन वर्षे पुढे गेला. पण जेव्हा प्रत्यक्षात आला तेव्हा चमत्कारच करतोय. बागणी च्या ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताच्या आनंदात चिंब असताना सरांच्या दाहक भाषणाने मनाची मशागत झाली. सर बोलत होते तेव्हा आमचे  छायाचित्रकार मित्र रवी काळेबेरे सतत स्टेजवर जाऊन सरांच्या पायापाशी पाण्याची बाटली आहे किंवा नाही याची खात्री करत होते. पण सरांनी पाण्याला हातही लावला नाही. रवी यांच्याच कॅमेऱ्यात कैद झालेली सरांची ही छायाचित्रे मुद्दामून येथे देतोय.... त्यातून सर्वांना कल्पना येईल. सरांच्या विषयी अधिक काही लिहिण्यापेक्षा त्यांना विनम्र दंडवत करणे मला योग्य वाटते.

- शिवराज काटकर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.