Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजी व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी अमृत जवान अभियान

 आजी व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी अमृत जवान अभियान




- 9 मे आणि 13 जून 2022 रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरावर "अमृत  जवान सन्मान दीन" आयोजित केला जाणार


सांगली दि. 7 : राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये माजी सैनिक, शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटुंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांच्या प्रलंबित कामाचा निपटारा जलद होण्यासाठी 1 मे ते 15 जून या कालावधीत "अमृत जवान अभियान 2022" संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरावर "अमृत जवान सन्मान दीन" दिनांक 9 मे आणि 13 जून 2022 रोजी आयोजित केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे देण्यात आली.

या अभियानांतर्गत महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड, पोलिस विभागाकडे विविध तक्रारी/समस्या, समाजकंटकांकडून त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी, जमीन / जमिनींच्या हद्दी/पाणी यावरून होणारे फौजदारी स्वरूपाचे वाद, ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावील रहिवास विषयक विविध बाबी, कृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने व इतर अनेक विभागांकडील अशा प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी अर्ज करता येतील. यासाठी अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे आवश्यक कागदपत्रासह संबंधीत तहसील कार्यालयात दोन प्रतीत सादर करून त्याची पोहोच घ्यावी. या अभियानांतर्गत न्यायप्रविष्ट प्रकरणे, अर्ध न्यायिक प्रकरणे, अर्जदराशी थेट संबंध नसलेली प्रकरणे  स्विकारली जाणार नाहीत.

अर्जदारांकडील प्राप्त अर्ज त्याच दिवशी संबंधित विभागाकडे पाठवला जाईल. संबंधित विभागाचे निर्णायक अधिकारी अर्जावर कार्यवाही करून त्याचा अहवाल तालुकास्तरीय / जिल्हास्तरीय समितीकडे सादर करतील. अशा सर्व अर्जांचा आढावा "अमृत जवान सन्मान दीन" बैठकीत घेतला जाईल. आवश्यक असल्यास अर्जदारांना या बैठकीत बोलावून निर्णय अवगत केला जाईल, विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.