ई-श्रम योजनेंतर्गत असंघटित कामगारांनी नोंदणी करावी
सांगली, दि. 2, : केंद्र सरकार मार्फत प्रत्येक गावातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम या योजनेची सुरुवात केली आहे. असंघटित कामगांराना सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांनी नोंदणी करण्याकरीता नजिकच्या ई महा सेवा केंद्रामध्ये संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ३१ डिसेंबर २००८ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ पारित केलेले आहे. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय जसे बिडी कामगार, मच्छीमार कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार या सारख्या विविध ३०० व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. दि. २६ ऑगस्ट २०२१ पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ईश्रम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेस आधारे असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार असल्याचे श्री. गुरव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.