Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार यांची टीका; कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आणि नेता गॅलरीत फेरफटका मारतो

 अजित पवार यांची टीका; कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आणि नेता गॅलरीत फेरफटका मारतो


सुरुवातीला टोलचे आंदोलन, नंतर परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन आणि आता भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. आंदोलनांमध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. बोलणारे घरी राहतात, नेता गॅलरीत फेरफटका मारतो, वा रे वा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या. राज्यात तुमची हुकूमशाही चालणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी गुरुवारी राज ठाकरे यांचा समाचार घेतला होता. भोंग्यांचे आंदोलन पुकारले असताना राज ठाकरे हे 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानातील गॅलरीत निवांतपणे फिरत असल्याचे दृश्य टीव्हीवर दिसत होते. या मुद्दय़ावरून पुण्यात बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आज पुन्हा फटकारले.

राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. पण त्याचा परिणाम काय झाले हे सगळय़ांनीच पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले. राज ठाकरे यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनांचाही त्यांनी समाचार घेतला. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कोणत्या आंदोलनाला यश आले, असा सवाल विचारून ते म्हणाले की, त्यांचे टोलचे आंदोलन वाया गेले, परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन पुकारले आणि बिहार, उत्तर प्रदेशच्या लोकांना हाकलवून दिले. त्यानंतर बिल्डरांकडे काम करायला कामगार शिल्लक राहिले नाहीत. आता भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. कार्यकर्ते नेत्यासाठी झटतात, आंदोलने करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी बोलताना जरा भान ठेवून बोलावे. आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी राज ठाकरे यांना दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.