अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (1 मे) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते.
चित्रपटच नव्हे, तर अनेक मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 'धुम धडाका', 'पागलपन', 'अर्जुन देवा', 'कुंकू झाले वैरी' आणि 'लग्नाची वरात लंडनच्या घरात' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'धुम धडाका' चित्रपटातील त्यांनी साकारलेली 'अंबाक्का' प्रचंड गाजली होती.
प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या 'उतावळा नवरा' या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रेमा किरण यांचा आठवणीत राहणारा किस्सा
झी मराठीवरील 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. या मंचावर महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या 'दे दणादण' या चित्रपटाविषयीचा एक किस्सा सांगितला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला होता.
प्रेमा किरण हा किस्सा सांगताना म्हणाल्या, 'पोलीस वाल्या सायकल वाल्या' या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झालं. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. या सीनमध्ये प्रेमा किरण या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, 'मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला', हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.