Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने संजय राऊत वैतागले, गाडीतून उतरुन हायवेवरुन चालत निघाले!

 दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने संजय राऊत वैतागले, गाडीतून उतरुन हायवेवरुन चालत निघाले!


सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावरील सातारा ते पुणे जाणाऱ्या मार्गावरुन वाहतूक कोंडीचा फटका कायमच सर्वसामान्य जनता सहन करत असते. तासन् तास अडकलेल्या वाहनधारकांना, प्रवाशांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. पण याच वाहतूक कोंडीचा फटका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बसला. संजय राऊत एकाच ठिकाणी तब्बल दीड तास खोळंबले होते. अखेर काही शिवसैनिक मदतीला आले. यानंतर संजय राऊत गाडीतून उतरले आणि पायी चालत हॉटेल गाठलं. तिथेच जेवण करुन वाहतूक कोंडी कमी होण्याची वाट पाहिली.

राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा नेता म्हणून शिवसेनेचे संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या अनेक विषयांमुळे चर्चेत असलेल्या संजय राऊत यांची रविवारी (29 मे) कोल्हापूरची सभा संपली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पुढे दोन मागे दोन गाड्या असा लवाजमा घेऊन ते कोल्हापुरातून सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचले. रात्री सुमारे अकराच्या दरम्यात ते साताऱ्यातील वेळे गावच्या हद्दीत पोहोचले. तिथून सुमारे दहा किलोमीटर पुढे खंडाळा घाट असतानाच संजय राऊत आणि त्यांचा ताफा गर्दीत अडकले. त्यांना पुढेही जाता येईना की मागेही. गाडी राँग साईडने घ्यावी तर तेही करता येईना. ताफ्यातील पोलीसही हतबल आणि सोबतचे कार्यकर्तेही.

याच भागातील शिवसैनिकांना याबाबतची माहिती समजली आणि पाच-दहा शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावले. स्थानिक शिवसैनिकांनी शक्कल लढवली आणि गाडी डीवायडरवरुन कोल्हपूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर काढली आणि राँग साईडने गाडी हळूहळू पुढे आणली. यावेळी काही अंतरावर असलेल्या आराम हॉटेलचे मालक रोहन भातोसे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना वाहतूक सुरळीत होईपर्यंत माझ्या हॉटेलपर्यंत चला अशी विनंती केली. मग काय आलिशान गाड्यांमधून आणि व्हीआयपी मॅटवरुन चालणारे संजय राऊत महामार्गावर अडकलेल्या गाड्यांमधून वाट काढत काढत चालत निघाले. सुमारे 200 मीटरचा पायी चालत प्रवास केल्यावर ते आराम हॉटेलवर पोहोचले. 

तेवढ्यात सेल्फी आणि फोटोसाठी लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. मात्र राऊतांच्या चेहऱ्यावर टेन्शन मात्र स्पष्ट दिसत होते. नंतर त्यांनी हॉटेलच्या व्हीआयपी रुमचा ताबा मिळवला. आर्धा तास झाला तरी वाहतूक काही सुरळीत होत नव्हती. अखेर त्यांनी त्याच ठिकाणी फ्रेश होऊन जेवणाचा बेत आखला. पिठलं भाकरी आणि त्यासोबत नॉनवेज, असं सर्व झाल्यावर त्यांनी वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहिली. सातारा पोलिसांचा लवाजमा घाटात जाऊन थांबला. सुमारे दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि संजय राऊत यांना ग्रीन सिग्नल मिळाला.

ज्या शिवसैनिकांनी राऊतांची या वाहतूक कोंडीमधून सुटका केली त्यांचं त्यांनी खास कौतुक केलं. मात्र शिवसैनिकांनीही त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार केला. दरम्यान वाहतूक कोंडीबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल विचारलं असता संजय राऊत यांनी फक्त हात करुन स्मितहास्य देत एबीपी माझाशी बोलणं टाळलं आणि काहीच झाले नाही असं दाखवून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण तुमच्यासारख्या व्हीआयपींची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांची या वाहतूक कोंडीत काय अवस्था होत असेल, याची कल्पना करा, असं विनंती सर्वसामान्य करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.