छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी.
छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी. त्यांनी उभारलेलं काम इतकं प्रचंड होतं की त्यापुढे आजचे राजकारणीही फिके पडतील. आपलं आयुष्य म्हणजे तसं क्षणभंगुर आज आहे तर उद्या नाही. पण, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मिळालेल्या आयुष्याचं सोनं केलं.
छत्रपती शाहू महाराजांचा प्रत्येक दिवस जनतेच्या कल्याणासाठीच उगवायचा. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. १८९४ साली कोल्हापूर संस्थानात ८ हजार ८८ इतकी ब्राह्मणेत्तर विद्यार्थी संख्या होती. ती १९२१-२२ साली २१ हजार २७ इतकी झाली. तर, १८९४ साली २३४ इतकी अस्पृश्य असलेली विद्यार्थी संख्या १९२१-२२ साली २ हजार १६२ इतकी झाली. स्त्री शिक्षणासाठी तर त्यांनी राजाज्ञाच काढली होती.
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ते सतत धडपडत असत. याचा एक किस्सा.. एकदा महाराज शिकारीला गेले. त्यावेळी एका पारध्यानं ससा मारला होता. महाराजांनी त्याला पाहिलं. हुजऱ्याकडून त्याला पुढं बोलावून घेतलं. त्या पारध्यानं हा ससा तुमच्यासाठीच मारून आणल्याचं सांगितलं.
महाराजांनी तो हुजऱ्याकडे देत आपल्या ताटात वाढण्यास सांगितलं. दुपारी सगळे जेवायला बसले. तो पारधी कुठं दिसेना, तेव्हा महाराजांनी त्याला शोधायला माणसं पाठवली. तो आल्यावर महाराजांनी त्याला जेवणाचं निमंत्रण दिलं. तो झाडाखाली जेवायला बसणार इतक्यात महाराज म्हणले, ज्याचे अन्न खात आहे त्याला लांब का बसवायचं? माझ्या शेजारी बस. एका पारध्याला महाराजांनी आपल्यासोबत पंगतीला जेवण्याचा मान दिला.
स्वतःच्या प्रजेची पोटच्या लेकराप्रमाणे ते काळजी घेत. त्यांचा रयतेबरोबर थेट संपर्क सातत्याने होत असे. राजेपणाची झूल बाजूला ठेवून महाराज सहज जनतेत मिसळायचे. त्याचाच हा एक किस्सा कोल्हापूरच्या गंगावेसमध्ये त्याकाळी मोठा बाजार भरत असे. एकदा महाराज असेच त्या बाजारात गेले. जवळच्या एका गावातली एक म्हातारी आजी टोपली घेऊन शेण्या विकायला आली होती. ती आजी दिवसभर उन्हात बसणार, मग घरी जाणार. त्यात विक्री किती होणार कुणास ठाऊक?
शाहू महाराजांना इतकंही दया अली. त्यांनी तिची शेऱ्यांनी भरलेली पुर्ण टोपली खरेदी करत दोन रुपये हातावर टेकवले. त्या आजीनं काही महाराजांना ओळखत नाही. तिच्या शेण्यांची किंमत ७५ पैसे होती. ती आजी प्रामाणिक होती. माझ्या शेण्यांची जितकी किंमत आहे तेवढीच द्या ती म्हणाली. जास्तीची रक्कम पाप आहे.
त्या आजीचा प्रामाणिकपणा पाहून शाहू महाराज भारावले आणि त्यांनी योग्य रक्कम तिच्या हाती दिली. त्या आजीला गाडीतून तिच्या गावी सोडलं. वडापची गाडी समजून ती गाडीत बसली. मात्र, नंतर तिला आपल्या गावापर्यंत सोडणारे शाहू महाराज होते हे कळलं आणि त्या आजीचा ऊर भरून आला.
त्याकाळी धर्माचं, जातीपातीचं स्तोम माजलं होतं. एकाच जातीत पोट जाती होत्या. प्रत्येक जातीचे वेगवेगळे नियम आणि कायदे असल्याचे. महाराजांनी ही जातीपातीची प्रथा मोडायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना एक निमित्त मिळालं. १९०५ च्या जुलै महिना. पावसामुळे जिकडे तिकडे चिखल झालेला. महाराज नव्या राजवाड्यातून आपल्या फोर्ड मोटारीतून बाहेर पडले. लिंगायत समाजाचा एक तरुण मुलगा गाडी चालवत होता.
काही अंतर गेलं आणि मोटारगाडीनं रस्ता सोडला. ती थेट चिखलात घुसली. त्या धक्यानं महाराज खाली पडले. सगळ्या चिखलानं त्यांचं अंग माखलं होतं. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी ‘घातलस मला खड्ड्यात’ म्हणत त्या तरूण मुलाच्या पाठीवर चपलेनी तडाखा दिला.
दुसऱ्या दिवशी नवीन ड्रायव्हर गाडीवर होता. त्या मुलाला मारल्याचं महाराजांना वाईट वाटलं. त्यांनी त्या मुलाला बोलावलं तो रडत समोर आला. महाराजांनी त्याला कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला. 'महाराज तुम्ही मारलं त्याचं वाईट वाटत नाही, पण, आमच्या समाजात चपलेचा मार खाल्ला की त्याचं तोंड पहात नाहीत.'
झालं महाराजांना संधी मिळाली. त्यांनी फौजदारांना बोलावलं. त्या मुलाच्या नातेवाईकांना, पुढाऱ्यांना बोलावून आणायला सांगितलं. त्या सगळ्यांना पापाच्या तिकटीसमोर सायंकाळी जमा करण्याचं फर्मान सोडत शेणानं भरलेली बादली आणि फाटके पायताण आणायलाही महाराजांनी सांगितलं.
संध्याकाळी ते सगळे जमा झाले. तेव्हा महाराजांच्या सुचनेनुसार त्या सगळ्यांच्या अंगावर शेण ओतून त्यांना पायतानाचा एक एक तडाखा मारला. त्या जमलेलयांनी शिक्षेचं कारण विचारल्यावर ते म्हणाले, रागाच्या भरात आम्ही त्या पोराला चप्पल मारली. आम्ही शिक्षा दिली. पण तुम्ही त्याला जातीतून बाहेर काढलं. आता तुमची सगळ्यांचीच जात बिघडली आहे, काय करता सांगा? त्या सगळ्यांना आपली चूक समजली आणि ही प्रथा बंद झाली.
छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.
बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी, त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या “मूकनायक” वृत्तपत्रासाठीही छत्रपती शाहू महाराजांनी सहकार्य केले होते. कोल्हापूरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, अभ्यासासाठीची व्यवस्था करून त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी डोळयात तेल घालून ते लक्ष देत असत.
‘शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे’, असं त्यांचं ठाम मत होतं. नवी अवजारे घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तज्ज्ञांची प्रात्यक्षिकं आयोजित केली, प्रदर्शनं भरवली. शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शनं भरवली. पन्हाळा, भुदरगड इथे चहा आणि कॉफी लागवड करण्याचा प्रयोग त्यांनी केला. वेलदोडे, कोको, रबर, ताग, बटाटे, लाख, टॅपिओका, कंबोडीयन कापूस अशा पिकांची लागवड करुन प्रयोगशीलता आणि प्रगतिशीलतेची चुणूक छत्रपती शाहू महाराजांनी दाखवली.
१८९६ ला कोल्हापुरात मोठा दुष्काळ पडला. महाराजांनी स्वत: दुष्काळग्रस्त भागात फिरले. अन्नधान्याची आयात केली. शेतकऱ्यांना सारामाफी दिली तर गुराढोरांसाठी वैरणाची व्यवस्था केली. दुष्काळग्रस्तांसाठी निराधार आश्रमांची सोय केली. बहुजन समाजातील लोकांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी फक्त आर्थिक मदत दिली नाही तर स्वतः काम दिलं.
शाहू महाराज गेले त्या दिवशी पंचगंगेच्या तीरावर राजकुलाच्या स्मशानभूमीत महायात्रा पोहचली. रुढीभंजक निर्णय आपल्या मृत्यूनंतरही अंमलात येईल याची तरतूद शाहू महाराजांनी केली होती. म्हणूनच वैदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थांच्या हातून महाराजांचे अत्यसंस्कार पार पाडले. ६ मे २०२२ ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी. महाराष्ट्राला वैचारिक वारसा देणाऱ्या या सुधारक व्यक्तीमत्वाला छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा!!!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.