Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

९२ वर्षाच्या आप्पासाहेब किणीकरांची संवेदना वृद्धसेवा केंद्रास ५ लाखांची देणगी समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी...!!!

९२ वर्षाच्या आप्पासाहेब किणीकरांची संवेदना वृद्धसेवा केंद्रास ५ लाखांची देणगी समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी...!!!


सांगली संवेदना शुश्रुषा केंद्रातर्फे सांगलीमध्ये वृद्धांची देखभाल व सेवा साठी उभारण्यात येत असलेल्या श्रीमती उषादेवी अण्णासाहेब पाटील सेवासदनच्या बांधकामासाठी सांगलीच्या मार्केट यार्डातील प्रतिष्ठित व्यापारी आप्पासाहेब किणीकर यांनी ५ लाख रुपये इतकी देणगीचा चेक संवेदनाचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे यांना दिला. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे शीतल पाटील, अमोल चौगुले, डॉ. नीलिमा शिंदे, सौ. आशा जोखे, सौ विजया देसाई, अपर्णा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुष्यभर सचोटीने व्यापार करून जमवलेली पुंजी जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर निवृतीच्या वाटेवर चालत असताना आपण समाजाप्रति काही देणे लागतो. या सामाजिक भावनेतून त्यांनी संवेदनास ही मदत केली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीसुद्धा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, तसेच समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे. अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांच्या सेवा शुश्रूषेचा प्रश्न अनेक कुटुंबांना भेडसावत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक या संस्थेस मदत करण्याचा निर्णय आपण घेतला असे आप्पासाहेब किणीकर यांनी सांगितले. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना किणीकर, मुली सौ. विजया सौ. शकुंतला व सौ. आशा यांचे पाठबळ मिळाले.

श्रीमती उषादेवी आण्णासाहेब पाटील या महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिकेच्या ११ लाख रुपये देणगीतून पहिल्या मजल्यावर सेवासदन घराची उभारणी करण्यात येत आहे. या विभागाचे बांधकाम सुरु करण्यात आले असून त्यासाठी कर्नल सुरेश गाडगीळ, क्लिअर कन्सेप्ट टिटोरियल, शांतिनाथ कांते व बापूसाहेब किणीकर यांनी प्रत्येकी २ लाख रुपये देणगी दिली आहे. माजी महापौर सुरेश पाटील यांचा पुढाकार व मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम सुरू असून आदगोंडा बाबगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी दुसऱ्या मजल्यावर टेरेस गार्डनही विकसित करण्यात येत आहे. अशी माहिती संवेदनाचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे यांनी दिली.

या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी ग्रॅनाइट व टाइल्स फरशी साठी वर्धमान टाइल्सचे शितल चौगुले यांचे सहकार्य लाभले असून येत्या जून महिन्यांमध्ये या नूतन संवेदना घराचे उद्घाटन होणार असून या नूतन इमारतीमध्ये रुग्णांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलिंग मार्फत बोलण्याची व संवाद साधण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार घेवून आमच्या सेवा कार्यास हातभार लावावा असे आवाहन डॉ. दिलीप शिंदे यांनी यावेळी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.