Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज पुणे पोलीस नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार; अमजद खान नावानं फोन टॅप झाल्याची माहिती

 आज पुणे पोलीस नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार; अमजद खान नावानं फोन टॅप झाल्याची माहिती


रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात आज पुणे पोलीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं होतं. बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांवर आरोप आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज मुंबईत येऊन नाना पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावानं नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळील नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देण्यात आला होता. यानंतर एबीपी माझानं हे प्रकरण उघड केल्यानंतर विधानभवनात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. याचप्रकरणी आज दुपारी 12 वाजता नाना पटोले यांचा जबाब पुणे पोलीस मुंबईत नोंदवणार आहेत.

दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचेही जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.

संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप : सूत्र

यापूर्वी संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप होत असल्याचं समोर आलं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचं कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावानं विनंती करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.