Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवउद्योजकांनी स्टार्टअप सप्ताहात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 नवउद्योजकांनी स्टार्टअप सप्ताहात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली दि. 27 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरूण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्याची मुदत 30 मे 2022 पर्यंत असून इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जापैकी अव्वल 100 स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या 24 स्टार्टअप्सना त्यांची नाविण्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत 15 लाख रूपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क-ऑर्डर्स) दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक आजवर चार वेळा यशस्वीपणे संपन्न झाला असून विजेत्या स्टार्टअप्सने राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था/ विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. यावर्षी देखील प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप वीक 2022 चे आयोजन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ईमेल team@msins.in अथवा 022-35543099 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.