रायगड पोलीस दल.. महिला सुरक्षितता व सबलीकरणासाठी सदैव सज्ज…!
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पथदर्शी सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन दि.01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मिनल दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला व मुले यांची सुरक्षितता व सबलीकरणाच्या अनुषंगाने भरोसा सेल, बडी कॉप, पोलीस काका/पोलीस दिदी, सुरक्षित शाळा, मनोधैर्य योजना, स्वसंरक्षणाबाबत प्रशिक्षण, विशेष बाल पोलीस पथक व महिला दक्षता समिती असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या लेखातून जाणून घेवूयात काय आहेत हे उपक्रम..
· भरोसा सेल:-
पिडीत महिला यांना समुपदेशन कायदेशीर सहाय्य, पोलीस संरक्षण, वैद्यकीय मदत, मानसिक सेवा, तात्पुरता निवारा अशा प्रकारची एकत्रित सुविधा देण्यासाठी "भरोसा सेल" स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस विभाग, विधी व न्याय विभाग, समाजसेवा, जिल्हा रुग्णालय, जिल्हा महिला बाल विकास विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील अधिकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आजपर्यंत या सेल अंतर्गत 262 महिलांचे समुपदेशन करुन त्यांना मदत करण्यात आलेली आहे.
· बडी कॉप:-
पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी जसे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इ. ठिकाणांच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच त्यांनी मदतीची मागणी केल्यास त्यांना त्वरीत व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉप यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. बडी कॉप मार्फत प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील नोकरदार महिला यांचा व्हॉटस् अॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. बडी कॉप अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत 199 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
· पोलीस काका /पोलीस दिदी:-
शाळेमधील बालके, लहान मुले/महाविद्यालयातील व अन्य प्रशिक्षण संस्थेतील आश्रमशाळेतील अथवा तत्सम संस्थेतील मुले / मुली यांची सुरक्षा व समस्यांचे निराकारण करण्यासाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पोलीस काका/पोलीस दिदी यांच्याकडून आजपर्यंत 541 शाळांना भेटी देवून 267 जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
· सुरक्षित शाळा:-
रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्हयातील शाळांमध्ये मुलांना व पालकांना संवेदनशील बनविण्यासाठी "सुरक्षित शाळा" हा उपक्रम "दि आंगण ट्रस्ट" या संस्थेच्या मदतीने हाती घेतलेला आहे. प्रत्येक उप विभागात दि.09 डिसेंबर ते दि.12 डिसेंबर 2021 व दि.20 डिसेंबर ते दि.27 डिसेंबर 2021 या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळांना 20 शाळांमधील उपस्थित 1 हजार 804 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी इत्यादी विषयांबाबत जनजागृती करण्यात आली.
· मनोधैर्य योजना:-
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/ प्र.क्र.35/का-2 मंत्रालय, मुंबई दि.1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयानुसार बलात्कार व अॅसिड हल्ल्यातील पिडीत महिला/बालके व इतर लैंगिक अत्याचारातील पिडीत बालके यांना मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. पिडीतांना मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याकरिता संबंधित पोलीस ठाण्याकडून प्रस्ताव प्राप्त करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विहीत वेळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात येतात.
· स्वसंरक्षणबाबत प्रशिक्षण:-
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वेळोवेळी शाळेतील मुलींना कराटे प्रशिक्षण, हत्यार ओळख, कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करुन सक्षम बनविण्यास प्रयत्न केले जात आहेत.
· विशेष बाल पोलीस पथक (SIPU Care):-
पिडीत बालकांना मानसिक बळ देणे व आधार देणे, विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे, पिडीत बालकांना तात्काळ वैद्यकीय सेवा/मानसोपचार तज्ञ / विधी तज्ञ संरक्षण अधिकारी व पुनर्वसन इत्यादी सेवा पुरविणे, विधी संघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी वारंवार समुपदेशन करणे याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर स्थापना करण्यात आलेली आहे.
· महिला दक्षता समिती:-
महिलांच्या संदर्भात विशेषत: विवाहित महिलांच्या अनुषंगाने त्याच्या संसारात होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबद्दल शारिरीक, मानसिक छळासंदर्भात तसेच महिलांवर होणाऱ्या इतर अत्याचाराच्या संदर्भात ही समिती पोलीस ठाणे स्तरावर अशा पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत करतात.
तरी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महिला पथदर्शी सुरक्षा प्रकल्पांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा जिल्ह्यातील पिडीत महिला, बालके यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांनी केले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.