पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलोय, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. बुधुवारी अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे. मात्र, मनसेकडून राज्यभर आंदोलन सुरु असताना पुण्यातील मनसेचे नगरसेवक कुठेच सक्रिय असल्याचे दिसले नाहीत. ते कालपासूनच नॉटरिचेबल झाले होते. मात्र, त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलो असल्याचे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितले आहे.
नेमकं काय म्हणालेत वसंत मोरे
पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आहे. त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आहे. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करु असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार...! अशी फेसबुक पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला तो त्यांच्याच पक्षातील वसंत मोरे यांच्या रुपात. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता. त्यानंतर मोरे हे राज ठाकरेंच्या ठाण्यातील आणि औरंगबादमधील सभेला देखील हजर होते. पण कालच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. कालपासून ते नॉट रिचेबल होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना त्यावेळी निमंत्रण नव्हतं. यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मोरेंनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.