Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पवार साहेब, फाटक्या लंगोटला किती ठिगळं लावणार ?

पवार साहेब, फाटक्या लंगोटला किती ठिगळं लावणार ?

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 


महाराष्ट्राचे जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पुण्यात ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांची बैठक बोलवली होती. या बैठकीवर काही संघटणांनी बहिष्कार टाकला  तर काही संघटना उपस्थित राहिल्या. केतकी चितळे प्रकरणानंतर शरद पवारांच्यावर ब्राम्हण विरोधी नेता अशी जाहिर टिका ब्राम्हण समाजातून होवू  लागली आहे नव्हे ती जाणिवपुर्वक घडवून आणली जात आहे. खरेतर शरद पवारांच्याबाबत अशी टिका काही नवीन नाही. पवारांच्यावर महाराष्ट्रातला बहूतांश ब्राम्हण वर्ग कधीच खुष नव्हता आणि नाही. काही अपवाद सोडले तर ब्राम्हण समाजात शरद  पवारांच्याविषयी चांगले मत नाही. महाराष्ट्रातला बहूतांंश ब्राम्हण समाज हा भाजपाचाच मतदार आहे. तो सर्व पक्षात, सर्व, संघटनात, सर्व चळवळीत विखुरला आहे. डाव्या-उजव्या आदी सगळ्या संघटनात आहे तसेच तो सर्व धर्मातही विखुरलाय, पसरलाय आणि स्थिर झालाय. अतिशय दृष्टा, जिद्दी, सुशिक्षित आणि संधी हेरणारा हा समाज नेहमीच इतरांच्या पुढे असतो. जिथे संधी असते, सत्ता असते तिथे तो असतोच असतो. इतक्या सगळ्या ठिकाणी तो विखुरला असला, पसरला असला तरी त्यांची सर्वाधिक जिव्हाळ्याची संस्था आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी. इतर कुठल्याही पक्ष-संघटनापेक्षा त्याची नैसर्गिक बांधिलकी भारतीय जनता पार्टीकडे अधिक आहे. पवारांनी कितीही बैठका घेतल्या, तेल लावले, लोणी लावले तरी ब्राम्हण मतदार शरद पवारांच्याकडे वळू शकत नाही, पवारांना मत देवू शकत नाही, पवारांची भलामण करु शकत नाही किंवा त्यांचे 'खरे' गोडवेही गावू शकत नाही. गेल्या काही वर्षात शरद पवारांनी दादोजी कोंडदेव, बळवंत मोरेश्वर पुरंदरे आणि शिवरायांचे गुरू म्हणून माथी मारण्याचा प्रयत्न केलेल्या  रामदास स्वामींच्या गुरूपदाबाबत घेतलेल्या भूमिकांचा राग या समाजात आहे. केतकी चितळे आणि कुठल्या भावेने समाज माध्यमात जी विषारी पिचकारी मारली होती ती या रागातूनच मारली होती. सोशल माध्यमात या समाजातले अनेक लोक अतिशय विकृत पध्दतीने शरद पवारांच्यावर भाष्य करतात, त्यांच्यावर टिका करतात, हे काही नवीन नाही.

शरद पवारांच्यावर अशी टिका ब्रम्हवृंदातून नेहमीच होत होती, पण थेट विरोध करण्याचे सामर्थ्य आजवर त्यांच्याकडे नव्हते. २०१४ ला केंद्रात आणि राज्यात भाजपाची पुर्ण बहूमताने सत्ता आली आणि त्या सत्तेने या लोकांना प्रचंड बळ आले. तोवर इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे समोर येवून बोलू लागले, टिका करू लागले आणि आव्हान देवू लागले. मोदींची सत्ता म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता आणि संघाची सत्ता म्हणजे ब्राम्हणांची सत्ता.  आता आमची सत्ता देशावर आहे, आमचा प्रधानमंत्री आहे, आमचा राष्ट्रपती आहे, आमचेच सर्व काही आहे तुम्ही आमचं काय वाकडं करू शकता ? असे अनेकजण सध्या बोलत आहेत. केंद्रात संघाची सत्ता असल्याने आलेल्या प्रचंड आत्मविश्वासामुळे हा समाज उघडपणे बोलतो, विरोध करतो. त्याचा विचार अक्षरश: लादतो. त्याच्या हातात समाजातली सर्व क्षेत्र आहेत. या समाजातल्या लोकांनी माध्यम सत्ता प्रचंड मोठ्या संख्येने व्यापली आहे. माध्यमात त्यांचे प्रमाण प्रचंड आहे. नव्हे तर माध्यमसत्ता त्यांच्याच ताब्यात आहे. साहजिकच त्यांच्या उपद्रवमुल्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळेच शरद पवारांना या बैठकीचे नियोजन करावे लागले. कदाचित ती त्यांची राजकीय गरज असेल किंवा खेळीही असेल पण पवारांनी फाटलेल्या लंगोटला कितीही टाके घातले तरी ती लंगोट टिकणारी नाही. टाके घालून ही लंगोट बांधताही येणार नाही. बाकी पवारांच्या खेळीचा प्रकार असेल तर पवारजाने. पण त्यांच्या या बैठकीमुळे समाजाचा बुरखा घेतलेल्या काही प्रतिगामी शक्ती बळावणार, त्यांचा 'अहं' वाढणार हे निश्चित. 

या समाजाला आता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने त्यांचा त्यांचा नेता मिळाला आहे. जो शरद पवारांना चँलेंज करू शकतो, बारामतीत त्यांना पाडण्याची भाषा करू शकतो. स्ट्रॉंग समजल्या जाणा-या अनेक मरहट्या नेत्यांना आपल्या तालावर नाचवू शकतो. असे असताना हा समाज शरद पवारांना आपलसं कसं करेल ? पवारांनी बैठका लावल्या, परशूरामाच्या नावाने महामंडळ उघडून दिले किंवा आणखी काय केले तरी ते शक्य नाही. कारण या समाजातल्या बहूतेकांसाठी शरद पवार खलनायक होते आणि आहेत हे वास्तव पवारांनी  स्विकारायला हवे. 

आजवर प्रतीगामी विचारधारा असलेल्या ब्राम्हणांचा आणि त्या विचारधारेला विरोध करणा-या अनेकांचा प्रचंड संघर्ष झालाय. या संघर्षाचा  इतिहासही मोठा आहे. यात अनेकांचे जीवही गेले. संत द्नानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, दिनकरराव जवळकर अशा अनेकांसोबत हा संघर्ष झालाय. आजही हा संघर्ष चालूच आहे. तो कधी संपेल ? हे दृष्टीपतात नाही. ब्रम्हवृदांचे बंड आजचे नाही इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर ते झाले आहे. त्यांच्या वर्चस्वाला कुणी आव्हान दिले की ते चवताळतात, एकवटतात आणि बुंदा हलवून घट्ट करतात. पण आजवरचा संघर्ष उघड उघड चालू होता. तो संघर्ष करणारे सगळे उघड उघड भूमिका घेत होते अपवाद शरद पवारांचा. शरद पवार यांच्या वाट्याला हा संघर्ष आला आहेच पण पवार त्याला उघड उघड संघर्षाचे स्वरूप देत नाहीत. ते डबलगेम खेळतात. त्यांचा हा डबलगेम त्यांच्याच अंगलट येणारा आहे. 

शरद पवार नावाचे व्यक्तीत्व उध्वस्त केल्याशिवाय संघाला महाराष्ट्र पुर्णार्थाने कधीच काबिज करता येणार नाही. त्या शिवाय महाराष्ट्रावर पुर्ण हुकूमत गाजवता येणार नाही हे संघ पक्के ओळखून आहे. म्हणूनच त्याने राजकीय हल्ल्यासोबत केतकी, पोक्षे वगैरे वगैरे नावाचे उलतन, लाटणे, पोळपट, चमचेही लढाईच्या मैदानात उतरवले आहेत. शरद पवारांनी आजवर राज्यातल्या पुरोगामी चळवळीचे बेनीफीट घेतले. त्यांनी जाणिवपुर्वक ब्राम्हण व ब्राम्हणेतर राजकारणाला चाल दिली. त्याचे राजकीय फायदेही उचलले पण त्यांनी राज्यातली पुरोगामी चळवळ ताकदीने मोठी केली नाही. एका बाजूने पुरंदरेच्यावर टिका करायची आणि तीच भूमिका घेणारे पक्षातले जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी ऐनवेळी एकटे पाडायचे, तोंडावर पाडायचे. आव्हाडांनी पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला मोठा विरोध केला होता. त्यावेळी बळवंत पुरंदरेंच्या पुरस्काराबाबत पवारांना विचारले असता ती पक्षाची भूमिका नाही ती आव्हाडांची व्यक्तीगत भूमिका आहे असे म्हणत पवारांनी त्यांना चुचकारले. कोरेगाव-भीमा प्रकरणाबाबत शरद पवारांची या पुर्वीची वक्तव्ये महाराष्ट्राने ऐकली आहेत. पण कोर्टासमोर साक्ष देताना संभाजी भिडे या व्यक्तीबाबत आपण वर्तमानपत्रात वाचल्याची व त्यांचा परिचय नसल्याची थाप ठोकून दिली. शरद पवार स्वत: भिडेंच्या कार्यक्रमाला सांगलीत आले असतानाही ते हात कसे काय वर करू शकतात ? पवारांच्या या दुटप्पी राजकारणामुळे राज्यातली पुरोगामी चळवळ नेहमी अपंग होत राहिली. तिला कधीच बाळसे आले नाही. पुरोगामी चळवळीनेही पर्यायी नेतृत्व निर्माण न करता चळवळ पवारांच्या दावणीला बांधून ठेवली. शरद पवारांनी या चळवळीला पुर्ण ताकद द्यायचा कधी प्रयत्न केला नाही. शरद पवार धोरणीपणाने या चळवळीचा उपयोग करतात. पुण्यात छगन भुजबळांच्या डोक्यावरची 'पुणेरी' पगडी काढून 'फुले' पगडी घालणा-या शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा होता ? हे न समजण्याइतका महाराष्ट्र खुळा नाही. पण पगडीचे औचित्य प्रामाणिकपणे विधायक अर्थाने वापरले असते, त्याच न्यायाने पुरोगामी चळवळ वाढवली असती. पक्षाच्या कार्यकर्त्यांना शाहू, फुले व आंबेडकर समजून सांगितले असते, त्यांचे विचार पक्षात केडर घेवून रूजवले असते किंवा राज्यातली आंबेडकरी चळवळ, संभाजी ब्रिगेड वाढू दिली असती तर कालची बैठक घ्यायची वेळ शरद पवारांच्यावर आली नसती. 

कालच्या बैठकीने पुरोगामी चळवळीत नक्कीच अस्वस्थता पसरली आहे.  पुरोगामी नेता म्हणून पवारांना झुकते माप देणारे यामुळे खच्ची होवू शकतात, त्यांचा शरद पवारांच्यावरील विश्वास उडू शकतो. तसेच या बैठकीमुळे ब्राम्हण समाजात पसरलेल्या प्रतीगामी शक्तींचा अहंकार आभाळाला भिडण्याची शक्यता जास्त आहे. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही ब्राम्हण समाजातल्या अनेक प्रगतशील विचाराच्या लोकांनी काम केले, योगदान दिले. या देशाच्या प्रगतीतही ब्राम्हण समाजातल्या अनेक चांगल्या लोकांचा मोलाचा वाटा आहे. आजही खुप सारे लोक व्यापक विचाराचे आहेत. पण विकृत व संकुचित ब्राम्हण्यवादाचे विष डोक्यात घेवून जगणारे काही  प्रतीगामी लोक देशासमोरील आव्हान आहेत. असे लोक देशावरील संकट आहेतच पण ते त्यांच्या स्वजातीवरीलही संकट आहेत. त्यामुळे ब्राम्हण समाजातील चांगल्या, जाणत्या व प्रगतशील विचाराच्या लोकांनी पुढे येवून केतकी, भावे, पोंक्षेसारख्या विकृत प्रवृत्तींना वेळीच चाप लावला  नाही तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागणार. कारण जे पेरले जाते तेच उगवते. "बोया पेड बबूल का तो आम कहॉ से लाओगे ? हा संत कबीरांचा सवाल ब्राम्हण समाजाने ध्यानात ठेवण्याची गरज आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.