पुणे : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची झाडाझडती
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये रेरा कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 10 हजार 561 दस्त नोंदविल्याचे उघड झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यातील मोठ्या शहरांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीमुळे दुय्यम निबंधकांचे कारनामे उघड होणार असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच, संबंधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करून रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानासुद्धा दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली.
जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुद्धा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी करण्यात आल्याचे शहरातील तपासणीमध्ये उघड झाले. याप्रकरणी 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच धर्तीवर ठाणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा राज्यातील प्रमुख शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हे तपासले जाणार
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या दस्तांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये रेरा क्रमांक नमुद आहे का. बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, बांधकाम परवानगी कोणत्या विभागाची आहे. याचसह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.