सांगली जिल्ह्यात सर्व कोरोना निर्बंधांना शिथिलता
सांगली, दि. 5, : प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य कार्यकारी समिती यांच्याकडील दि. 31 मार्च 2022 च्या आदेशान्वये राज्यात लागू असलेले कोरोना निर्बंध शिथिल केलेले आहेत. राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने दिनांक 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. भविष्यात कोविड-19 चा संभावित धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे व दोन्ही लस घेणे यावर भर देण्याचे सूचित करण्यात आले आहे. आरोग्यासंबंधी सर्व नियमांचे पालन करून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेल्या सर्व निर्बंधाना शिथिलता देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपती व्यवस्थापन प्राधिकरण सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना खालीलप्रमाणे शिथिलता दिली आहे.
(1) सांगली जिल्ह्यात कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आपती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी प्रमाणे लागू केलेले सर्व निर्बंध याव्दारे मागे घेण्यात येत आहेत.
(2) दिनांक 22 मार्च 2022 रोजी केंद्रीय गृह सचिव आणि त्यानंतर 23 मार्च 2022 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
(3) जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यापारी आस्थापना, संघटना, संस्था यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे चालू ठेवावे. त्यामुळे आरोग्यास धोका उद्भवणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तसेच समाजात रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळता येईल.
(4) जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे व आपल्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात कोविड-19 चे नवीन प्रकरण, उपचार चालू असलेल्या रूग्णांची संख्या, पॉझिटिव्हीटी दर तसेच वैद्यकीय संस्था आणि रूग्णालयातील व्यापलेल्या बेड्सची संख्या याकडे बारकाईने लक्ष द्यावे. जर यातील काहीही धोकादायक वाटल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास याची तात्काळ माहिती द्यावी. जेणेकरून प्राथमिक स्थितीतच रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी उपयुक्त अशी उपाययोजना करता येईल.
(५) केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने परिपत्रकान्वये कोविड-19 विषयक निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कोविड-19 सुयोग्य वर्तणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी पंचसुत्रीचे पालन करून (कोविड-19 चाचणी, रूग्ण-शोधणे, उपचार करणे, लसीकरण आणि नियमांचे पालन) कोविड-19 प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित करून त्याचप्रमाणे याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.