सत्ता ई प्रकारातील अडचणींबाबत मार्ग काढू ना. बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
सांगली, दि. ५ : सत्ता ई प्रकारातील मिळकतदारांच्या अडचणींबाबत मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊन शंभर टक्के मार्ग काढला जाईल आणि नागरिकांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सांगली दौऱ्याच्यावेळी विश्रामधाममध्ये झालेल्या बैठकीत दिले.
काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन केले होते. सत्ता प्रकार ई मधून सांगली संस्थान काळातील मिळकती निर्बंधमुक्त व्हाव्यात, यासाठी २० फेब्रुवारी, २०२२ रोजी शासन आदेश निघालेला आहे. त्याद्वारे नगर भूमापन कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत कार्यवाही सुरू आहे, परंतु त्यात काही अडचणी होत्या, त्यासाठी ही बैठक होती. यावेळी ॲड. अभिनंदन शेटे, अमित खोकले यांनी मिळकतदारांच्या अडचणी मांडल्या.
तत्कालीन सांगली संस्थानने जाहीरनाम्याद्वारे मालकी हक्काने या मिळकती दिल्या आहेत. या मिळकतीच्या हस्तांतरणास परवानगीची आवश्यकता नाही, असे शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद आहे, परंतु याचा समावेश शासन निर्णयाच्या आदेशात होणे गरजेचे आहे, असे श्री. पृथ्वीराज पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
नागरिकांनी आपल्याकडे असलेले जुने पुरावे सादर केले होते, तसेच भूमापन विभागाकडे असलेले कागदपत्रही होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. भाडे पावत्या व अन्य पुरावे सध्या उपलब्ध होत नाही, हे लक्षात घेऊन निर्णय झाला पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले.
ना. थोरात यांनी मंत्रालयातील संबंधित अधिकार्यांशी फोनवरून चर्चाही केली. ज्या नागरिकांकडे जुने पुरावे, भाडे पावत्या आहेत, त्यांचे प्रस्ताव भूमापन विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून जिल्हाधिकार्यांकडे दाखल केले आहेत, परंतु बहुसंख्य नागरिकांकडे पन्नास ते शंभर वर्षांपूर्वीच्या भाडे पावत्या किंवा अन्य पुरावे उपलब्ध नाहीत, हे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत शासनस्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्ता ई नागरिकांच्या वतीने ना. थोरात यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार डी. एस. कुंभार, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक किशोर जाधव, जिल्हा भूमापन अधिकारी ज्योती पाटील, सनतकुमार कत्ते, रोहिणी देशमुख, राहुल आरवाडे आणि इतर नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.