कार्यकर्त्यांनी सभा मोठी केली.. --रावसाहेब पाटील
सांगली दि. ३: दक्षिण भारत जैन सभा आज १२३ वर्षाची झाली. सभेने या कालावधीत प्रचंड मोठे योगदान दिले आहे. कोणीतरी पदाधिकारी म्हणून काम करणं आवश्यक असतं म्हणून त्या निवडी होतात पण खऱ्या अर्थाने सभेचे काम करणारे सर्व कार्यकर्ते हे पदाधिकारीच आहेत. ते वेळ व बुद्धी खर्च करून काम करतात आणि धनिक व समाजाकडून धन प्राप्त होते म्हणून सभेच्या कामाला बळ मिळते. आज सभा, महिला परिषद आणि प्रगती आणि जिनविजय मुखपत्राचा वर्धापन दिन साजरा होत आहे. व्यक्तीचे वाढदिवस व्यक्तीचे वय वाढत असल्याचे द्योदक तर संस्थेचा वर्धापन दिन संस्था अधिक तरुण व दमदार होत असल्याचे द्योतक आहे. आतापर्यंत सभेच्या कामात अनेक समाजधुरिणांनी नेतृत्व व कर्तृत्व दिले आहे. आता मा. रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली सभेने संस्कार, शिक्षण व आरोग्य यामाध्यमातून गरुड झेप घेतली आहे. सभेचे व महिला परिषदेचे शंभरावे अधिवेशन लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होण्यासाठी समाजाने साथ द्यावी. समाजाचे दातृत्व फार मोठे आहे. चांगल्या कामासाठी समाज कायम सढळ हाताने मदत करत असतो. असे प्रतिपादन आज वर्धापन दिन कार्यक्रमात सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. आज सभेच्या सभागृहात आयोजित दक्षिण भारत जैन सभा आणि महिला परिषदेचा १२३ वर्धापन दिन व सभेचे मुखपत्र प्रगती आणि जिनविजयच्या १०९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. अजित पाटील यांनी केले.अध्यक्षीय भाषणात भालचंद्र पाटील यांनी सभेच्या योगदानाचा उल्लेख करताना समाजातील धनिक दानशूर व्यक्ती आणि शाखांचे पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सभेची मुला-मुलींची वसतिगृहे,महिला परिषदे, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि पदवीधर संघटना व प्रगती आणि जिनविजयच्या माध्यमातून लक्षवेधी काम उभे राहिले आहे. दादांच्या नेतृत्वाखाली सभा दमदार वाटचाल करीत आहे. ही सभा अधिकाधिक मोठी होण्यासाठी आपण सारे एकीने काम करु या असे त्यांनी आवाहन केले. सुरेश पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, अंजली कोले, महावीर आडमुठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगती आणि जिनविजयच्या अंकाचे डिजीटलायझेशन काम पहाणारे कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी सभेचा इतिहास नव्या पिढीला कळायला हवा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या कामी सभेच्या वसतिगृहातील मुला - मुलींचा उपयोग करुन त्यांना डिजीटलायझेशन कामात तज्ञ बनवणार असल्याचे सांगितले. शेवटी आभार प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मानले. या वर्धापन दिन कार्यक्रमात सभेचे पदाधिकारी व शाखांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.