महाविकास आघाडीला मत दिलेत तर याद राखा, भाजपची आता मतदारांना 'ईडी'ची धमकी
महाविकास आघाडीला मत दिलेत तर याद राखा, तुमच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावू, अशी धमकी भाजपने आता थेट मतदारांनाच दिली आहे.
राज्यातील सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरले आहे. उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने आता 'ईडी' आणली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर आज थेट मतदारांनाच धमकी दिली.
भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पेटीएमद्वारे प्रतिव्यक्ती एक हजार रुपये ट्रान्सफर करण्याची महाविकास आघाडीची पूर्वतयारी सुरु असल्याचा आरोप केला. मात्र हा आरोप करतानाच त्यांनी थेट कोल्हापुरातील मतदारांनाच ईडीची धमकी दिली आहे.
मनी लॉण्डरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यामुळे थोडय़ा रकमेच्या मोहात पडून आपल्या बँक खात्याचा तपशील दिल्यास पुढे ईडीच्या चौकशीच्या फेट्यात अडकू शकता.
एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेत असून पेटीएमद्वारे मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करुन मत विकत घेतले जाणार असल्याचा आरोप पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला. पाटील एवढय़ावरच थांबले नाहीत तर तुमच्या खात्यात प्रतिव्यक्ती एक हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे आढळल्यास तुमचीही ईडीकडून चौकशी करायला लावू. तेव्हा महाविकास आघाडीला मत दिलेत तर याद राखा, अशी धमकीच पाटील यांनी मतदारांना दिली. हे पैसे कोठून आले, कोणी दिले, का दिले याबाबत तुम्हाला ईडीला उत्तर द्यावे लागेल. एक हजार रुपयांसाठी तुम्ही तुमच्यामागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, अशी पुस्तीही पाटील यांनी आपल्या धमकीला जोडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.