राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार आहे. मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
मात्र, काही संघटना आणि नेत्यांनी राज ठाकरेंच्या सभेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच आता राज ठाकरेंच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सदर याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार असेल तर पोलिसांनी राज ठाकरे यांचे भाषण तपासावे. महाराष्ट्र पेटू शकतो, त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालावी, अशी मागणी जयकिशन कांबळे यांनी केली आहे. पोलिसांकडून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही नियम आणि अटी घातलेल्या आहेत.
दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरावेत, असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी दिला होता. त्यातच आता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असं म्हणत राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.