सांगली : गलाई कारागिराकडून तब्बल ५५ लाखांची चोरी
विटा : सोने-चांदी गलाईतील एका कारागीराने तब्बल ५५ लाखांचे ९६० ग्रॅम सोने आणि रोख ५० हजार रुपये घेऊन पलायन केल्याची घटना हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे घडली. या प्रकरणी संशयित कारागीर राजेंद्र शंकर साळुंखे (मूळ गाव पारे, ता. खानापूर) याच्या विरुद्ध गुरुग्राम येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पारे येथील संताजी शहाजी जाधव यांचे अनेक वर्षांपासून हरियाण येथील गुरुग्राम शहरात सोने चांदी गाळण्याचे अर्थात गलाईचे दुकान आहे. या दुकानात सोने खरेदी करून ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून दिले जातात. पारे येथील राजेंद्र साळुंखे याला दोन महिन्यांपासून दागिने तयार करण्यासाठी कारागीर म्हणून महिना १२ हजार रुपये पगारावर कामाला ठेवले होते. त्याच्यासोबत झरे (ता. आटपाडी) येथील सचिन अशोक यादव हासुद्धा काम करीत आहे. साळुंखे आणि यादव संबंधित दुकानाच्यावरच्या मजल्यावर राहण्यास होते.मागच्या आठवड्यात २३ एप्रिल रोजी यादवने दुकानाची साफसफाई केली.
त्यानंतर तो अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर संशयित साळुंखे याने यादवच्या पॅन्टमधील खिशातील कपाटातील चावी घेतली. कपाट उघडून त्यातील रोख ५० हजार रुपये व ९६० ग्रॅम वजनाचे सुमारे ९९ लाख रुपये किमतीचे सोने घेऊन तेथून पलायन केले. ही घटना दुकान मालक संताजी जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी साळुंखेचा शोध घेतला; परंतु तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे जाधव यांनी त्याच्याविरुद्ध शनिवारी गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.