Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लहान मुलांचे आवडते किंडर चॉकलेटमधून बॅक्टेरियाची लागण; 11 देशांमध्ये आढळले संक्रमण

 लहान मुलांचे आवडते किंडर चॉकलेटमधून बॅक्टेरियाची लागण; 11 देशांमध्ये आढळले संक्रमण


दिल्ली : बेल्जियममध्ये तयार होत असलेल्या लोकप्रिय किंडर चॉकलेटमधून साल्मोनेलोसिस जीवाणूचे संक्रमण झाल्याची 150 हून अधिक प्रकरणे 11 युरोपीय देशांत आढळून आली आहेत. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

साल्मोनेलोसिस हा साल्मोनेला या जीवाणूमुळे होत असलेला एक आतड्यांसंबंधी रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव युरोप आणि अमेरिकेत अधिक दिसून येत आहे. याचा मुले आणि वृद्ध व्यक्तींना डिहायड्रेशनशी संबंधित गंभीर गुंतागुंत होऊन धोका होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की ब्रिटनने एक महिन्यापूर्वीच या चॉकलेटमध्ये साल्मोनेलाचे जीवाणू आढळून आल्याचे सांगत सतर्क केले होते. या जीवाणूचे संक्रमण झाल्याची प्रकरणे बेल्जियम ते अमेरिकेपर्यंत आढळून आली आहेत. साल्मोनेला जीवाणू संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरातून किंडर चॉकलेटची विक्री थांबवण्यात आली आहे. या जीवाणूमुळे 10 वर्षाहून कमी वयाची मुले संक्रमित होत आहेत. तर एकूण संक्रमित प्रकरणांमध्ये मुलांचे प्रमाण 89 टक्के आहे. मात्र या संक्रमणामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.

साल्मोनेलोसिसची लक्षणे सौम्य असतात आणि बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्ण काही विशिष्ट उपचारांनी संसर्गातून बरे होतात. पण मुले आणि वृद्ध लोकांना याचा जास्त धोका आहे. जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा हा रोग अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो.

11 देशांमध्ये संसर्ग पसरला

जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की ज्या 11 देशांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे त्यात बेल्जियम (26), फ्रान्स (25), जर्मनी (10), आयर्लंड (15), लक्झेंबर्ग (1), नेदरलँड (2), नॉर्वे (1), स्पेन (1), स्वीडन (4), ब्रिटन (65) आणि अमेरिकेतील एका प्रकरणाचा समावेश आहे.

अशी आहेत लक्षणे

साल्मोनेलोसिसच्या संसर्गामुळे ताप, पोटात दुखणे, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे संक्रमित अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर 6 ते 72 तासांनी जाणवू लागतात आणि साल्मोनेलामुळे संक्रमित झालेले पाणी आणि त्यामुळे उद्भवलेला आजार 2 ते 7 दिवस राहू शकतो.

मानवांमध्ये असा पसरतो

साल्मोनेला जीवाणू कोंबड्या, बदके, डुक्कर यांच्यासह अन्य पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. साल्मोनेला जीवाणू मुख्यतः अंडी, मांस, कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थांसह संक्रमित अन्न खाल्ल्याने मानवांमध्ये पसरतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.