Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गडकरीच म्हणतात,काँग्रेस बळकट व्हायला हवी

 गडकरीच म्हणतात,काँग्रेस बळकट व्हायला हवी


पुणे : विरोधी पक्ष असेल, तरच लोकशाही टिकून राहील. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष असायला हवा. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे.

त्यामुळे काँग्रेस बळकट व्हायलाच हवी, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 'हिंमत हरली नाही, तर पराभवातही विजय असतो', असा मंत्रही त्यांनी दिला.

'लोकमत'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'लोकमत पत्रकारिता पुरस्कारां'चा प्रदान सोहळा गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाला. यानंतर रंगलेल्या दिलखुलास मुलाखतीत गडकरी बोलत होते. लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांच्या थेट प्रश्नांना गडकरी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. लोकशाहीबद्दल काय वाटते? या विजय दर्डा यांच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, विरोधी पक्ष असेल तर लोकशाही राहील. राजकारणात विचारांच्या आधारावर मतभिन्नता असते. पण आपण शत्रू नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. ती परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशी विचारधारा कधीच अपेक्षित नाही. सर्वांनी विचारधारेशी प्रामाणिक राहायला हवे. विचारभिन्नतेपेक्षा शून्यता ही खरी समस्या आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही

* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ज्या वेळी केंद्रात जाण्याची इच्छा नव्हती, त्यावेळी राष्ट्रीय राजकारणात गेलो.

* आता तेथे सुखी आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. क्षमतेपेक्षा मला खूप चांगल्या संधी मिळाल्या. त्यानुसार मी काम करत राहिलो. मी महत्त्वाकांक्षी नेता नाही. मी 'कनव्हिक्शन' असणारा नेता आहे.

शेवटी मालक ते मालकच

गडकरी यांच्याकडे पूर्वी असलेल्या गंगा शुद्धीकरण आणि जलवाहतूक या खात्यात झालेल्या बदलाचा संदर्भ देऊन गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक ठिकाणी कुठला संपादक ठेवायचा हे जसे मालक ठरवतात, तसे आमच्याकडे मंत्रीपद हे पंतप्रधान ठरवितात. शेवटी मालक ते मालक असतात. कोणाला काढायचे, कोणाला ठेवायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो.

भाजप-शिवसेनेचा पूल बांधणार का?

या प्रश्नावर गडकरी म्हणाले, जे बांधायचे कॉन्ट्रॅक्ट असते तेच बांधायचे असते. मी फक्त नॅशनल हायवे बांधतो. महाराष्ट्राचे कंत्राट माझ्याकडे नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.