बहुप्रतीक्षित 'सुरश्री संगीत महोत्सव २०२२' ची तयारी अंतिम टप्प्यात
सांगली : येथील बऱ्याच कालखंडानंतर सलग ३ दिवस होणाऱ्या अभिजात शास्त्रीय संगीत, नृत्य, वाद्य आणि वादनाची रेलचेल असणाऱ्या सुरश्री संगीत महोत्सव २०२२ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव दि. ११,१२,१३ मार्च शुक्रवार ते रविवार दरम्यान रोज सायंकाळी ५ ते १० या वेळेत संपन्न होणार असून जगभरातील ख्यातनाम संगीत, कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत. उत्कृष्ट संगीताबरोबरच विख्यात चित्रकारांची उत्कृष्ट पेंटिंग व शिल्पकारांच्या विविध शिल्पकलाकृती या संमेलनातील प्रदर्शनात असणार आहेत.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम स्थळावर म्हणजेच श्री. ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल धामणी-कोल्हापूर रस्ता सांगली येथील भव्य प्रांगणात ३० हजार स्क्वेअर फुटाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात ३०x४० स्क्वेअर फुटाचे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. त्यामध्ये ध्वनी संयोजन, नयनरम्य प्रकाश योजना, बैठक व्यवस्था रंगमंच व्यवस्था भव्य LED स्क्रीन्स, डिजिटल फोरमसाठी लागणारी सर्व यंत्रणा उभी करण्यात येत आहे. रसिकांच्या सुविधेसाठी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल देखील ठेवण्यात येणार आहेत. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील या परिसरात करण्यात येत आहे. त्याचबरोबर रसिकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी व कार्यक्रमानंतर परत जाण्यासाठी शिवाजी पुतळा (मारुती चौक) व राजमती भवन, सांगली येथून बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अशी माहिती सुरश्री संगीत महोत्सवाचे संयोजक मिलेनियम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच माजी महापौर सुरेश पाटील आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.