सांगली शहर महामार्गाला जोडा
मिरज - अंकली रस्त्यावर बॉक्स कमानी करा : सांगली - संकेश्वर महामार्ग व्हावा : सांगली - शिरोली नाक्याची कनेक्टिव्हिटी अर्ध्या तासांची हवी : बायपासवर उड्डाणपूल आवश्यक पृथ्वीराज पाटील यांचे ना. नितीन गडकरी यांना निवेदन
सांगली, दि. २६ : सांगली शहर महामार्गाला जोडल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही. व्यापार - उद्योगाच्यादृष्टीनेही ते आवश्यक आहे. त्याकरिता शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे अत्यंत वेगाने पूर्ण करावीत, असे निवेदन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी याला सांगली दौऱ्याच्या वेळी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे परंतु, ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले नाही. या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने ते अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता पेठ ते सांगली आणि पुढे कागवाड, संकेश्वर हा महामार्ग तातडीने करण्यात यावा. या महामार्गामुळे व्यापार, उद्योग आणि दळणवळण या सर्वदृष्टीने प्रगती होणार आहे.
सांगली शहराजवळील कृष्णा नदीवरच्या बायपास पुलाजवळच्या शिवशंभो चौकापासून माधवनगर रोडपर्यंत फ्लायओव्हर करण्याची आवश्यकता आहे. सन 2005, 2019 आणि 2021 या वर्षांत कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे हा रस्ता जवळपास पंधरा ते वीस दिवस पाण्याखाली राहतो, त्यामुळे शहराचा संपर्क तुटतो. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील मिरज ते अंकली दरम्यानच्या रस्त्यावर इनाम धामणी ते जुनी धामणी यादरम्यान मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्याखाली पाणी जाण्यासाठी फक्त पाईपा टाकण्यात आल्या आहेत. महापुराचा कटू अनुभव लक्षात घेता या पाईपमधून पुराचे पाणी पास होवू शकत नाही. याठिकाणी मोठ्या बॉक्स कमानीच आवश्यक आहेत. आत्ताचा भराव लक्षात घेता ज्या ठिकाणी पुराचे पाणी येत नव्हते, त्या भागातही पाणी येईल आणि सांगली शहराचा 75 टक्के भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. आसपासच्या गावांनाही तोच धोका निर्माण होणार आहे. त्याकरीता या रस्त्याखाली बॉक्स कमानी कराव्यात.
सांगली-कोल्हापूर रस्त्याची कनेक्टीव्हिटी अर्ध्या तासांची झाल्यास त्याचा फार मोठा फायदा सांगलीकरांना होणार आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग शहरांच्या बाहेरून गेला आहे. त्यामुळे सांगली ते अंकली आणि पुढे शिरोली नाका, कोल्हापूरपर्यंत या रस्त्यांची कामे अत्यंत वेगाने पुर्ण करावीत. बायपासला जोडणारा अंकली पूल, हातकणंगले शहराजवळवचा पूल ही कामे पुर्ण व्हावीत. ही कनेक्टीव्हीटी अर्ध्या तासांची झाल्यास सांगलीतल्या लोकांना कोल्हापूरच्या विमानतळालाही कमीत कमी वेळेत पोहचता येईल. तसेच पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ची कनेक्टीव्हिटी अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांची होवू शकेल, त्याचाही फायदा नोकरदार, व्यापार, उद्योग आणि दळणवळण यासाठी हाईल. तरी वरील सर्व बाबींची पुर्तता करण्याच्यादृष्टीने आपण घोषणा करावी किंवा संबंधीत अधिकारी यांना सदरची कामे प्रस्तावित करणेचे आदेश देवून आवश्यक त्या निधीची तरतूद करणेस मान्यता द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.