राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबीराचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते उद्घाटन
सांगली दि. 11 : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 मध्ये संदर्भित करण्यात आलेल्या हृदयरोग संशयीत लाभार्थ्यांच्या 2डी इको तपासणी शिबीराचे आयोजन डी.ई.आय.सी. इमारत सांगली येथे करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील 309 लाभार्थ्यांची इको तपासणी डॉ. अर्जून अडनाईक, स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकांमार्फत किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. या तपासणीमधून हृदय रोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात. कोविड-19 दरम्यान शाळा व अंगणवाडी बंद असल्याच्या कारणाने तसेच राष्ट्रीय बाल स्वास्था कार्यक्रम पथकांना कोविड कामकाज प्रतिनियुक्ती दिल्याने शाळा व अंगणवाडी लाभार्थ्यांची तपासणी प्रलंबित राहिली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी कर्मचारी व डी.ई.आय.सी. अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याबाबत संकल्पना राबविली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या पुढाकाराने व योग्य नियोजनामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून अत्यंत अल्प कालावधीमध्ये 0 ते 18 वयोगटातील लाभार्थी तपासणी पूर्ण करण्यात आली. अंगणवाडी सेविकांनी संदर्भित केलेल्या लाभार्थ्यांची तसेच जास्तीत जास्त अंगणवाडी व शाळा यांना भेट देवून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. या अंतर्गत हृदयरोग संशयीत लाभार्थ्यांपैकी आज आयोजित केलेल्या मोफत 2डी इको तपासणीअंती 74 इतके लाभार्थी हृदय शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले आहेत. शिबीरादरम्यानच अत्यंत तातडीची हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या 6 लाभार्थ्यांना तात्काळ 108 रूग्णवाहिकेने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये गंभीर हृदय शस्त्रक्रियेकरीता रूग्णालयात दाखल करण्यात आले. दि. 12 व दि. 13 रोजी या बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत.
डी.ई.आय.सी. कार्यक्रमांतर्गत डॉ. कल्याणी शिंदगी व डॉ. नवाजशरिफ मुजावर यांच्या उपस्थितीमध्ये विकासात्मक वाढीतील दोष व अध्ययन अक्षमता या गटातील 32 लाभार्थ्यांची मोफत तपासणी डॉ. कश्मिरी भडभडे यांच्या मार्फत करून पुढील उपचाराचे नियोजन करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, व्यवस्थापक कविता पाटील व कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस यांनी शिबीराचे नियोजन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.