ओपन हार्ट शस्त्रक्रियेकरीता 38 बालके मुंबईला रवाना
सांगली दि. 25 : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अतिशय प्रभावी काम झाले आहे. हा कार्यक्रम दि. १ एप्रिल २०१३ पासून सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत आजअखेर १ हजार ९०८ गंभीर हृदय शस्त्रक्रिया व ९ हजार ३६३ इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आज ओपन हार्ट मोफत शस्त्रक्रियेकरिता शारिरिकदृष्ट्या पात्र असलेल्या ३८ बालकांना एस आर.सी.सी. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. या सर्व बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया होवून सर्व बालके स्वस्थ होवून आपल्या जिल्ह्यात परत येवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त करून बालकांना व त्यांच्या पालकांना धीर देत शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र २ बसद्वारे मोफत भोजन, निवास व प्रवास व्यवस्थेसह पाठविण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, बालरोगतज्ञ डॉ. कल्याणी शिंदगी, वैद्यकिय अधिकारी डॉ. नवाजशरीफ मुजावर, डॉ. विनायक पाटील, डॉ. उज्वला मोटे, डॉ. गुरव, पालक उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने आजअखेर १ हजार हृदय शस्त्रक्रियांचा टप्पा प्रभावीपणे पूर्ण केलेला आहे. सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३२ पथकांमार्फत संदर्भित करण्यात आलेल्या हृदयरोग संशयित लाभार्थी यांचे २डी इको तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरांतर्गत जिल्हयांतील ० ते १८ वर्षे वयोगटातील ३०९ लाभार्थ्यांची इको तपासणी पूर्णपणे मोफत करून त्यामधील ७३ लाभार्थी शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. ७३ बालकांपैकी स्वस्तिक हॉस्पिटल, कोल्हापूर येथे पूर्ण करण्यात आलेल्या डिव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया वगळून ओपन हार्ट शस्त्रक्रियेकरिता शारिरिकदृष्ट्या पात्र असलेल्या ३८ बालकांना एस आर.सी.सी. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.