असदुद्दीन ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोऱ्यांचे फोटो समोर, सांगितलं हल्ल्यामागचं कारण
उत्तर प्रदेश, 04 फेब्रुवारी: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी गुरुवारी संध्याकाळी मेरठहून परतत असताना त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला.
संबंधित घटनेचा आता लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. टोल नाक्यावर त्यावेळी नेमकं काय घडलं हे जसच्या तसं तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान या घटनेतील हल्लेखोऱ्यांचा फोटो आता समोर आले आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हल्लेखोर दोघंही मित्र ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हल्लेखोऱ्यानं गुन्हा कबूल करून हल्ल्यामागचं कारण सांगितलं. दोन्ही आरोपी लॉ ग्रॅज्युएट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोघेही चांगले मित्र असून एकाच कॉलेजमध्ये शिकले आहेत.
ओवैसींच्या 'त्या' वक्तव्याचा आला होता राग चौकशीत आरोपी सचिन हा बदलपूरचा तर शुभम हा सहारनपूरचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, दोघंही सतत द्वेषपूर्ण भाषणाचा पाठपुरावा करतात. पोलिसांना हटवा, मग दाखवू, असे वक्तव्य ओवैसी यांच्या भावाने दिल्याचे आरोपींनी सांगितले. त्या वक्तव्याने दोघेही संतापले.
आरोपींची चौकशी अद्याप सुरू आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद संबंधित घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एक लाल रंगाच्या शर्टमधील मुलगा टोल नाक्यावर ओवैसी यांच्या गाडीच्या जवळून जातो. यावेळी त्याच्या हातात काहीतरी आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी फायरिंगचा आवाज येतो.
हल्लेखोर ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करतात. त्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हल्ला करणारा तरुण किती वेगात पळाला ते व्हिडिओत स्पष्टपणे जाणवत आहे. त्याला पळताना बाजूने जाणारी कारही दिसली नाही.
त्यामुळे त्याचा पाय त्या कारमध्ये जातो आणि तो खाली पडतो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाच्या शर्टातील एक तरुण समोरुन येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तो ओवैसींच्या गाडीवर थेट गोळीबार करतो.
विशेष म्हणजे सीसीटीव्हीत हल्ला करणाऱ्या त्या दुसऱ्या तरुणाचा चेहराही दिसत आहे.ओवैसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेला जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.
घटनेनंतर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.ओवैसी यांनी स्वत: ट्विट करुन या घटनेची माहिती गुरुवारी दुपारी ट्विटरवर दिली होती. "काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार केला गेला. चार राउंड फायर झाल्या.
ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे", असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.