तीन दिवसांपासून गायब एसीबीचे पोलीस निरीक्षक सांगलीत दिसले; शोधासाठी दोन पथके रवाना
जालना : पत्नीला भाकरी करायला सांगून घराबाहेर पडलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवारी ते सांगली शहरात दिसून आले असून, मित्राकडे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहे.
जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे शहरातील यशवंतनगर भागात राहतात. बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास पत्नी व ते सोबत होते. पत्नीला भाकरी करायला सांगून ते बाहेर पडले. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन, खिशातील वॉच पाकिटही सोबत नेलेले नाही. घटनेची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे व पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताटे यांचा शोध घेण्यात आला. परंतु, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे रात्री उशिरा ताटे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. अंबड व औरंगाबाद चौफुली परिसरात ते एका वाहनातून जाताना पोलिसांना दिसले. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती. शिवाय, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांनाही सांगण्यात आले होते. शनिवारी सांगली शहरात फिरत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्हीत ते दिसून आले. सांगली येथे त्यांचा मित्र असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके सांगलीला रवाना झाली आहे.
शोधासाठी दोन पथके सांगली येथे रवाना
पोलीस निरीक्षक ताटे यांचा शोध सुरू आहे. सांगली शहरात ते दिसून आले आहे. त्यानुसार त्यांच्या शोधासाठी दोन पथके सांगली येथे रवाना करण्यात आली आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल.
- विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, जालना
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.