स्मार्टफोन स्वस्त होणार आणि मोबाईल रिचार्ज महागणार
नवी दिल्ली : मोबाईल ग्राहकांसाठी अत्यंत नकारात्मक वृत्त आहे. देशभरातील कोट्यवधी मोबाईल ग्राहकांना आता रिचार्जसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार, स्मार्ट फोन खरेदी स्वस्त करण्यात आली असली तरी मोबाईल रिचार्ज महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दर महिन्याला मोबाईल ग्राहकांना आर्थिक झळ पोहचणार आहेय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन वापरणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे महागाईचा बोजा मोबाइल ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ना फायदा, ना तोटा अशा पद्धतीने मोबाईल वापरता येईल.
अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन पार्ट्सच्या आयातीवर सूट दिली आहे. म्हणजेच स्मार्टफोनचे घटक, चार्जर यांच्या आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. अशा स्मार्टफोन कंपन्यांना परदेशातून स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे पार्ट्स आयात करण्यावर कमी कर भरावा लागेल. भारतात 5G स्मार्टफोनची खूप मागणी आहे. 5G स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे चिपसेट आणि इतर घटक विदेशातून आयात करावे लागतात. अशा परिस्थितीत आयात शुल्कावर सूट मिळाली तर स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी होईल. त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईल फोन व्यतिरिक्त, भारतात इतर उपकरणांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्टफोन अॅक्सेसरीजच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार यावर्षी फाय जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे 5G नेटवर्क २०२२च्या मध्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात सुरू केले जाऊ शकते. तसेच, सुरुवातीच्या काही काळात 5G रिचार्ज खूप महाग असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच महागडे रिचार्ज खरेदी करावे लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.