किरीट सोमय्यांची विचारपूस करण्यासाठी रात्रीच रुग्णालयात पोहोचले उदयनराजे भोसले
पुणे, 06 फेब्रुवारी : शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. यावेळी किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
पुणे पालिकेत शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या झटापटीत सोमय्या पायऱ्यांवरून थेट खाली कोसळले. त्यांना दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांची विचारपूस करण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले रात्रीच पुण्यात दाखल झाले. रात्री पुण्यात जाऊन उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याभेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांचेवर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय असल्याचं ते म्हणालेत.
सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अशा हल्याच्या घटना घडल्यास अशा घटनेचं कोणीही समर्थन करु शकणार नाही, असं म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजे भोसले यांनी निषेध केला आहे.
कॉलर धरून किरीट सोमय्यांना खाली पाडलं पुणे दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या पुणे महापालिका कार्यालयात आले. पण यावेळी प्रचंड मोठा गदारोळ झाला. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं.
सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी असलेल्या पुणे पालिकेतील भाजपचे घोटाळेही बाहेर काढा असं निवेदन देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. त्यावेळी शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली.
यावेळी भाजपचे कार्यकर्तेही धावून आले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांनी सोमय्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना मागे ओढत गाडीपर्यंत घेऊन चालले होते. पण, अचानक एक कार्यकर्ता पाठीमागून आला आणि त्याने घोषणाबाजी सुरू केली.
याच वेळी सुरक्षारक्षक आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत सोमय्या थेट पायऱ्यांवरून खाली पडले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवले आणि तिथून निघून गेले. शिवसैनिकांचं स्पष्टीकरण दरम्यान, "किरीट सोमय्या आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. त्यांच्या घरामध्ये म्हणजे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. त्यावर त्यांना बोलायला भाग पाडायचं होतं. त्याबाबत त्यांना निवेदन द्यायचं होतं. त्यासाठीच आम्ही गेल्या एक तासापासून इथे थांबलो होतो. ते अर्धातास उशिरा आले. आमची दिशाभूल केली गेली. ते नवीन गेटला आले असं सांगण्यात आलं. तिथून आम्ही या ठिकाणी पळत आलो. त्यांच्यासमोर निवेदन केलं. त्यांच्यासमोर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावलं. आम्हाला ढकलून दिलं.
काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडले. पडल्यामुळे ते इथून पळून गेले. आम्ही पळून त्यांची गाडी अडवली. आम्ही रस्त्यावर झोपलो. त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली. आमची शिवसेना पूर्वी जशी काम करत होती तसंच काम करेल", अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.