Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत 'सैराट'चा थरार, प्रेमविवाह करणं ठरला मोठा गुन्हा

 मिरजेत 'सैराट'चा थरार, प्रेमविवाह करणं ठरला मोठा गुन्हा


सांगली, 4 फेब्रुवारी : महाराष्ट्राची  पुरोगामी अशी ख्याती आहे. या महाराष्ट्राच्या मातीत महापुरुषं जन्माला आली. पण पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनपेक्षित अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे या 21 व्या शतकात प्रेम विवाह  क्षुल्लक गोष्ट मानली जात असताना ही संकल्पना आजही महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यांमध्ये रुळलेली नाही. प्रेमविवाह केला म्हणजे घराण्याची अब्रू वेशीला टांगली, असे भूरसटलेले विचार आजही महाराष्ट्रातील काही भागांमधील नागरिकांमध्ये आहेत. त्यातूनच 'सैराट'  चित्रपटासारख्या भयानक आणि थरारक घटना वारंवार या महाराष्ट्रात होताना दिसत आहेत. सांगतील एक तशीच एक घटना घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमधील एका गावात सख्या भावाने आपल्या बहिणीचा प्रेमविवाह केला म्हणून मुडकं उडवून जीव घेतला होता. विशेष म्हणजे या हत्येत मुलीच्या जन्मदाती आईचादेखील तितकाच हात होता. खोट्या प्रतिष्ठेसाठी प्रेमविवाह केलेल्या मुलीची हत्या करण्याची ही पहिली घटना नव्हती. याआधीदेखील तशा घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे सैराट सारखा प्रसिद्ध चित्रपट या सत्य घटनेवर येऊन गेला. पण तरीही काही माणसं विचारांनी बदलताना दिसत नाही. सांगली जिल्ह्यातील मिरजेत अशीच घटना समोर आली आहे. एका तरुणावर प्रेम विवाह केला म्हणून त्याच्या सासरच्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय. पण सुदैवाने तो बचावला आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेतील पीडित तरुणाचं योगेश लवाटे असं नाव आहे. या तरुणाने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. तरुणाचं त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पण तिच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्रेमविवाह केला. पण या प्रेमविवाहाने मुलीच्या कुटुबियांना राग आला होता. त्यांना मुलीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटत होती. समाजात आपली नाचक्की झाली या भावनेतून त्यांना सूड घ्यायचा होता.

या दरम्यान दोन दिवसांपूर्वी योगेश लवाटे आणि मुलीचे आई-वडील यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. हे भांडण इतकं मोठं झालं होतं की प्रकरण थेट मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं होतं. संबंधित घटनेनंतर योगेश हा गुरुवारी (3 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घरी निधाला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. पण या घटनेमुळे त्याचे कुटुंबिय पूर्णपणे खचले आहेत.संबंधित घटनेची दखल मिरज शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून तपास केला. तिथे त्यांनी परिसरातील नागरिकांसोबत घटनेबाबत विचारपूस केली. पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलीस संशयित आरोपींची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पण या घटनेमुळे मिरज शहरसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.