Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप

 पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. या भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. देशभरात कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसने परप्रांतीय मजुरांना मोफत रेल्वे तिकिट काढून उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाठवले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली असली तरी त्यांचे वक्तव्य महाराष्ट्र आणि परप्रांतीय कष्टकरी वर्गाचा अपमान करणारे असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले.

काय म्हणाले होते पंतप्रधान

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाउनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

ट्वीटरवर भाजपविरोधात ट्रेंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले. ट्वीटरवर #महाराष्ट्रद्रोही_bjp हा ट्रेंड सुरू झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधानांचे वक्तव्य संवेदनाहीन असल्याचे म्हटले. अचानकपणे लॉकडाउन लावून कष्टकरी, गरीब मजूरांना वाऱ्यावर का सोडले, असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

जगभरात कोरोनाची लाट येत असताना विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते, असाही मुद्दा नेटकऱ्यांनी मांडला.पायपीट करून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपले गाव गाठणाऱ्या मजुरांचे हाल दिसले नाही, का असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.

काही युजर्सने भाजप नेत्यांची जुनी भाषणे ट्वीट केलीय. या भाषणांच्या क्लिपमध्ये मजुरांसाठी रेल्वे सोडल्याचे श्रेय भाजप सरकारला देत असल्याचे भाजप नेते दिसत आहेत.कोरोना महासाथीचे सावट असताना नमस्ते ट्रम्प आणि निवडणूक प्रचार सभा घेतल्या त्याने कोरोना पसरला नाही का, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.