ठरले...महाराष्ट्रात निर्बंध कठोर होणार
मुंबई,
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला आहे.
कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा
राज्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढत आहे. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात कोरोना विषयावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचे ठरले. राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत, असे यावेळीव अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होकार आल्यावर नवे निर्बंध लावणार आहेत, असे अजित पवार म्हणाले. हे निर्बंध सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे.
नव्या निर्बंधाची नियमावली जारी होणार राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे आढवा बैठकीत एकमत झाले. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी होऊ शकते. निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊन लागण्याची धास्ती संपली आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, करोठ निर्बंध लावण्यात येणार आहेत. तशी आज नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा गृहात उपस्थिती 50 टक्के होण्याची शक्यता आहे.
सध्या असणारे निर्बंध संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.