नाशिक पाठोपाठ सांगली द्राक्ष बागायतदारांचा महत्वाचा निर्णय, काय आहे द्राक्ष दर निश्चितीचे धोरण?
नवाच पायंडा पाडला आहे.
द्राक्ष दर निश्चिती आणि अंमलबजावणी. त्याला नाशिक जिल्ह्यात सुरवात झाली असून आता हे लोण राज्यभर पसरत आहे. नाशिक पाठोपाठ सांगली येथेही द्राक्ष बागायतदारांची बैठक पार पडली असून याठिकाणी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. द्राक्ष उत्पादन खर्चावर 10 टक्के नफा हे धोरण आखूनच हे दर ठरविण्यात आले आहेत. तर बेदणा विक्रीसाठी बाजारपेठ महत्वाची असून याकरिता रेझीमची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे.
बैठकीत काय ठरले दर ?
गत महिन्यात नाशिक येथे दर निश्चितीबाबत बैठक पार पडली होती. आता द्राक्ष बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी अशा बैठका घेऊन द्राक्षाचा दर हा निश्चित केला जात आहे. दर ठरवताना द्राक्ष उत्पादनावर कीती खर्च झाला आहे त्यानुसार 10 टक्के नफा मिळावा हा उद्देश ठेऊन द्राक्ष दर ठरविण्यात आला आहे. 35 ते 55 रुपये प्रति किलो हा दर द्राक्षासाठी निश्चित करण्यात आला आहे तर दुसरीकडे बेदाण्याला त्याच्या प्रतवारीनुसार 80 ते 250 असा दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या खर्चावर किमान चार पैसे मिळतील यानुसार हे दर ठरवले जात आहेत.
गत दोन वर्षापासून द्राक्ष बागेतून केवळ नुकसानच
द्राक्ष लागवडीपासून सुरु झालेला खर्च हा द्राक्ष तोडणीपर्यंत कायमच असतो. शिवाय गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका उत्पादकांना होत आहे. यंदा तर बागा ऐन बहरात असतानाच अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिवाय सरकारचे धोरणही तोट्याचेच असून यंदाच्या हंगामापासून द्राक्ष बागायतदार संघ हा दर ठरवित आहेत. या अनोख्या उपक्रमाची सुरवात झाली ती नाशिकमध्ये. महिन्याभरापूर्वीच स्थानिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणाऱ्या द्राक्षांचे असे वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहेत.
असे आहेत बैठकीत झालेले निर्णय
निर्यात करण्यात येणाऱ्या द्राक्षाला 85 रुपये किलो तर स्थानिक बाजारपेठेत सुपरसोनाका या वाणाच्या द्राक्षासाठी 50 रुपये प्रति किलो तर अनुष्का 55 माणिकचमन 40 व थॉमसन 35 रुपये किलो असे दर ठरले आहेत. बेदाण्याचे दर हे प्रतवारीनुसार सर्वाधिक दर 250 तर डागाळलेल्या बेदाण्यासाठी 80 रुपये किलो असे दर ठरविण्यात आले आहेत. ठरलेल्या दराचे पालन करायचे, कोणीही नियम मोडायचे नाहीत, ओळखपत्र पाहूनच दलाला द्राक्ष विक्री करायची, बेदाण्याच्या मार्केटसाठी नवनविन कल्पना मांडण्यात याव्यात, तसेच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यात य़ावा असे निर्णय बैठकीत झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.