Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यभरातील जुन्या वाहनांची मोडतोड होणार या ४ शहरांमध्ये

 राज्यभरातील जुन्या वाहनांची मोडतोड होणार या ४ शहरांमध्ये


मुंबई: हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच व्हेहिकल स्क्रॅपिंग पॉलिसी म्हणजेच वाहन भंगारात काढण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे.

त्यानुसार पंधरा वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना, तर खासगी किंवा वैयक्तिक वाहनांना २० वर्षांनंतर भंगारात काढावे लागणार आहे. याच धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वाहन निर्माता कंपन्यांतर्फे ठिकठिकाणी स्क्रॅपिंग युनिट स्थापन करण्यात येत आहे. महिंद्रा या प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनीकडून स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्यात येत आहे.

कार स्क्रॅपिंग युनिट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर केल्याची माहिती महिंद्रा ग्रुपने दिली. महिंद्रा एमएसटीसी रिसायक्लिंग प्रायव्हेट लिमिटेड असे कंपनीचे नाव आहे. ही कंपनी सिरो ब्रँडअंतर्गत रिसायक्लिंग संयंत्रांचे संचालन करते. कंपनीकडे आधीपासूनच पुण्यात एक रिसायक्लिंग संयंत्र आहे.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या चार शहरांमध्ये चार संयंत्र स्थापन करण्याचा कंपनीचा विचार आहे. संयंत्रांची वार्षिक क्षमता ४० हजार वाहनांची असेल. कायदेशीर आणि पर्यावरणीय निकषानुसार खासगी आणि व्यावसायिक वाहनांचा पुनर्वापर करण्यास मदत होणार आहे. कंपनीकडे सध्या देशभरात ११ रिसायक्लिंग संयंत्र आहेत.

काय आहे धोरण

वाहनांची नोंदणी कालावधी संपल्यानंतर त्वरित हे धोरण लागू होईल. पण एखादे वाहन जुने आहे म्हणून त्याला थेट भंगारात काढले जाणार नाही. त्याची ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये तपासणी केली जाईल. या तपासणीत वाहने उत्तीर्ण झाली नाहीत अशी वाहने रद्द केली जातील. त्यांची आधीची नोंदणी रद्द ठरवली जाईल. १५ वर्षे जुन्या खासगी वाहनांची पुन्हा नोंदणी करण्यासाठी जास्त पैसे आकारले जातील. फिटनेस चाचणी आणि स्क्रॅपिंग सेंटरशी संबंधित नियम १ ऑक्टोबर २१ पासून लागू झाले आहेत. सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांची १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याचे नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील. तर व्यावसायिक वाहनांसाठी आवश्यक फिटनेस चाचणीशी संबंधित नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. इतर वाहनांसाठी आवश्यक फिटनेस चाचणीशी संबंधित नियम १ जून २०२४ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.