Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात

 विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात


सांगली : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यावरून काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेस भवनासमोर काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात विशाल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. पृथ्वीराज पाटील यांनी उद्घाटने करावीत व तिकीट मला मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. यावरून ते विधानसभा निवडणूकच लढवतील, अशी चर्चा रंगली होती. विधानसभेच्या तिकिटावरून पृथ्वीराज पाटील व त्यांच्यात संघर्ष होईल, असेही मत व्यक्त होऊ लागले होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम देत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निकटवर्तीय कार्यकर्त्यांसमोर त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आतापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांना त्यांनी तयारीचे आदेशही दिल्याचे समजतेे.

मागील लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्यांनी आतापासूनच मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघावर सर्वाधिक काळ वसंतदादा घराण्याचे वर्चस्व राहिले आहे, मात्र मागील दोन निवडणुकांत भाजपने हा मतदारसंघ काबीज केला.

खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून भाजपने या मतदारसंघावर झेंडा रोवला आहे. त्याला आता विशाल पाटील पुढील निवडणुकीत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मागील निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर लढवली होती, यंदा ते काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

भाजपअंतर्गत नाराजीचा फायदा होणार?

खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल पक्षांतर्गत अनेकांची नाराजी आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखच त्यांच्याविरोधात आहेत. याशिवाय भाजपमधील अनेक नेत्यांशीही त्यांचे पटत नसल्याने या गोष्टीचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो, याची खात्री त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दादा घराण्याची व्होट बँक अद्याप सुरक्षित असून त्यात भाजपमधील नाराज नेत्यांची साथ मिळाल्यानंतर विशाल पाटील यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा तर्क लावला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.