नववर्षामध्ये निरपेक्ष भावाने सर्वांशी प्रेम करत जावे
निरंकारी सद्रगुरु माता सुदीक्षाजी महाराज
दिल्ली, २ जानेवारी, २०२२: “निराकार प्रभूला साक्षी मानून सर्वांभूती प्रेमभावाचा अंगीकार करावा. ‘प्रेम’ केवळ शब्दांपर्यंत सीमित राहू नये. ते आपल्या जीवनात आणि व्यवहारात उतरावे. जर आम्हाला प्रेम आणि आदर यांच्या बदल्यात प्रेम व आदर मिळत नसेल तरीही आपण आपले हृदय विशाल करुन सर्वांच्या प्रति प्रेमाचीच भावना धारण करायची आहे.” हे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षानिमित्त व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या विशेष सत्संग समारोहामध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमाचा लाभ संत निरंकारी मिशनच्या वेबसाईट द्वारे जगभरातील निरंकारी भक्तांनी व प्रभुप्रेमी सज्जनांनी प्राप्त केला.
सद्गुरु माताजी म्हणाल्या, की क्षणोक्षणी निराकार प्रभूला हृदयामध्ये धारण करुन आपण आपले हृदय इतके पवित्र करावे, की त्यातून केवळ प्रेम आणि प्रेमच उपजेल; वैर, ईर्षा, निंदा, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांना त्यामध्ये स्थानच उरु नये.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की मागील दोन वर्षांतील परिस्थिती पाहिली तर कोरोनामुळे कित्येक लोकांच्या उद्योग-व्यवसायांवर विपरित परिणाम झाला, शिवाय प्रत्यक्ष रूपात सत्संगाचे कार्यक्रमही बंद झाले. परंतु ज्ञान प्राप्तीनंतर प्रत्येक ब्रह्मज्ञानी संताला ही बाब अवगत झाली आहे, की त्याच्यासाठी प्रत्येक दिवस, महिना आणि वर्ष भक्तिमयच असतात. मग त्याच्या जीवनात एखादे वर्ष बदलण्याचे किंवा विशिष्ट दिवसाचे काही महत्व उरत नाही. ईश्वराची जाणीव ठेवून तो सदोदित आनंदाने जीवन व्यतीत करत असतो.
सद्गुरु माताजींनी समस्त निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की त्यांनी निराकार प्रभूचा आधार घेऊन हृदयामध्ये परोपकाराची भावना बाळगावी आणि मर्यादापूर्ण जीवन जगून समस्त मानवजातीला प्रेम वाटत जावे.
याशिवाय, परमपूज्य सद्गुरु माताजींनी भक्ती पर्व आणि महाराष्ट्राच्या ५५व्या प्रादेशिक संत समागमाच्या तारखा देऊन भक्तगणांना आनंदित केले.
भक्ती पर्व समागम – १६ जानेवारी, २०२२ रोजी निश्चित करण्यात आला आहे जो सकाळी ११.०० ते दुारी २.०० वाजेपर्यंत मिशनच्या वेबसाईटवर व्हर्च्युअल रूपात प्रसारित करण्यात येईल. समस्त भक्तगण या भक्तीपर्व समागमाचा आनंद प्राप्त करु शकतील.
महाराष्ट्राचा ५५ वा निरंकारी संत समागम
महाराष्ट्राचा ५५वा प्रादेशिक निरंकारी संत समागम ११, १२ व १३ फेब्रुवारी, २०२२ रोजी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येईल अशी घोषणा या नववर्ष सत्संग समारोहामध्ये करण्यात आली.
या दोन विशेष सूचना श्रवण केल्यानंतर समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.