"नकली घोड्यावर बसणाऱ्या 'मैने'ला पद्म, पण केंद्राच्या दृष्टीने अण्णाभाऊ साठे 'प्रतिष्ठित' नाहीत"
याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा, अशी विनंतीही केली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रसिद्ध वा प्रतिष्ठित नसल्याचा 'शोध' केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असणाऱ्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनने लावला आहे. डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडे देशातील महापुरुषांची यादी असून, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा समावेश नसल्याचे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार, तसेच डॉ. आंबेडकर फाऊंडेशनला पत्र लिहिले होते. या पत्रात अण्णा भाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करण्याची विनंती केली होती. यानंतर आता रोहित पवार यांनी केंद्रावर टीका केली आहे. यावेळी रोहित पवार यांनी बॉलिवूड क्वीन कंगना रणौत हिला देण्यात आलेल्या पुद्म पुरस्काराचा धागा पकडत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अण्णाभाऊ साठे यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा
नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या 'मैने'ला पद्म पुरस्कार दिला जातो, पण 'माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली' या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने 'प्रतिष्ठित' नाहीत. कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुल साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा,ही केंद्र सरकारला विनंती!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, देशातील महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीदिनी अभिवादन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने योजना राबवली जाते. अण्णाभाऊ साठे यांचा या यादीत उल्लेख नसल्याने या योजनेतही त्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. या योजनेत अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश करण्यास डॉ. आंबेडकर फाऊंडेशनने असमर्थता व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.