पंतप्रधानपदाला असले वर्तन शोभत नाही; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी डागली तोफ
चंदीगड : पंजाबात शेतकरी निदर्शकांकडून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा अडवला गेल्याच्या कारणावरून निर्माण झालेले राजकारण अजून थांबायला तयार नाही.
पंजाब सरकारकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे कारण पुढे करीत भारतीय जनता पक्षाने पंजाबातील कॉंग्रेस सरकारच्या विरोधात मोठाच आगडोंब सुरू केला आहे, त्याला प्रतिसाद देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी म्हटले आहे की, राज्यातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार बरखास्त करण्याचे कारण शोधण्यासाठीच पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा बनाव भाजपकडून सुरू आहे.
पंतप्रधान हे देशाचे सन्माननीय नेते आहेत, त्यांच्या पदावरील व्यक्तीला असले वर्तन शोभा देत नाही.
होशियारपुर येथे नवीन गोदामाचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या जीवाला कोणत्याही पद्धतीने धोका झालेला नाही. फिरोजपुर येथील त्यांच्या सभेला अजिबातच गर्दी न जमल्याने हा सारा बनाव केला गेला आहे. सभेच्या ठिकाणी बहुतांशी खुर्चा मोकळ्या दिसल्याने जीवाला धोका निर्माण झाल्याचे खोटे कारण पुढे करून मोदी ही सभाच रद्द करून दिल्लीला रवाना झाले.
पंजाबची बदनामी करण्यासाठी आणि येथील लोकशाही मोडीत काढण्यासाठीच हा सारा प्रकार केला गेला आहे असे त्यांनी म्हटले आहे. निदर्शक मोदींपासून किमान एक किमी अंतरावर असताना मोदींच्या जीवाला धोका कसा काय निर्माण होऊ शकतो असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींचा ताफ जिथे थांबला होता, तेथे कोणी एक घोषणाही दिलेली नाही असे असताना त्यांच्या जीवाला कोठून धोका होणार होता असा सवालही मुख्यमंत्री चन्नी यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की पंजाबी नागरीकांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे, हे लोक पंतप्रधानाच्या जीवावर उठणारे नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. पंजाबातील आपल्या सभेला अत्यंत अपुरा प्रतिसाद मिळाल्यानेच त्या सगळ्यांची माथी भडकली आहेत. त्यातून त्यांना येथे राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे पण असला प्रकार सहन केला जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर सर्व हवामानात उड्डाण करू शकणारे
खराब हवामानामुळे पंतप्रधानांनी इप्सित स्थळी हेलिकॉप्टर ऐवजी मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते, परंतु पंतप्रधानांसाठी जे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते ते सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करू शकते अशा दर्जाचे होते. परंतु तरीही पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरचा ठरलेला दौरा रद्द करून आयत्यावेळी मोटारीने जाण्याचा निर्णय कसा काय घेतला असा सवाल पंजाब सरकारकडून उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.