Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही", वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा दावा

"प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही", वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा दावा


नवी दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर भारतात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. या व्हायरसला रोखणे शक्य नाही. जवळपास प्रत्येकाला ओमायक्रॉनची लागण होणार आहे, असे आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी एनडीटीव्हीला या वृत्तवाहिनीला सांगितले. तसेच, कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले, 'ओमिक्रॉन हा एक आजार आहे ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित 80 टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्या संसर्ग कधी झाला? त्यामुळे याबाबतची मनातील भीती दूर करून या आजारासोबत जगायला आपण शिकले पाहिजे.' याचबरोबर, कोरोनावरील लस पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असे मतही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी मांडले.

कोणत्याही वैद्यकीय संस्थेने व सरकारच्या सल्लागारांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिलेला नाही. बूस्टर डोस महामारी रोखू शकत नाही हे वास्तव असून प्रीकॉशनरी डोस देण्याबाबत सरकारला सल्ला दिला गेलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा वृद्ध व्यक्तींचा विचार करून हा सल्ला दिला गेला आहे, असेही ते म्हणाले. तसेच, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीची करोना चाचणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे. अशा स्थितीत रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाची करोना चाचणी करण्याने काहीही साध्य होणार नाही. साथीचा फैलाव ज्या वेगाने होत आहे त्या वेगाने तुम्ही चाचण्या करू शकत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही, असे डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी म्हटले आहे.

याशिवाय, कडक लॉकडाऊनबाबत डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले की, आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. हे समजून घेणे आवश्यक आहे की ओमायक्रॉनचा प्रभाव डेल्टा व्हेरिएंटपेक्षा खूपच सौम्य आहे. लस देशात येईपर्यंत सुमारे 85 टक्के भारतीयांना संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत, लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.