Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचण्या प्रतिदिन 3 ते 4 हजारापर्यंत वाढवा

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरआरटीपीसीआर चाचण्या प्रतिदिन 3 ते 4 हजारापर्यंत वाढवा

            जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

            चाचण्या वाढविण्यासाठी नविन आरटीपीसीआर मशिन उपलब्ध करु दिले जाईल

सांगली, दि. ६ : कोरोनाच्या तीसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून येत्या 15 ते 20 दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  प्रतिदिन आरटीपीसीआरच्या चाचण्या तीन ते चार हजार पर्यंत वाढविण्यात याव्यात. यासाठी नवीन आरटीपीसीआर मशिन उपलब्ध करु दिले जाईल. त्याच़ बरोबर व्ही. आर. डी. एल. लॅबला आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करुन देवू. याबाबीसाठीचे मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, व्ही. आर. डी. एल. लॅबच्या प्रमुख डॉ. विनिता कुलकर्णी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना वार्ड तातडीने सुसज्ज करा. या ठिकाणी असलेल्या आय.सी.यु. बेड, ऑक्सिनेटेड बेड, तातडीने सज्ज करा. संबधित यंत्र सामुग्री यांची तपासणी करुन सुसज्ज ठेवण्यात यावे. त्याचबरोबर औषधाची उपलब्धता करण्यात यावी. पुढील एक महिना पुरतील इतक्या औषधांचा साठा करण्याचे नियोजन करावे. सद्यस्थितीत उपलब्ध असणारा साठा याची पडताळणी करुन कमी असणारी औषधे व अत्यावश्यक महत्वाची औषधे याची मागणी तातडीने करण्यात यावी. बालरुग्ण विभागात बालकांसाठी असणारी सर्व अत्यावश्यक यंत्रणा सुसज्ज ठेवावी. 

जिल्हाधिकारी डॉ.‍ अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्णसंख्येचे प्रमाण वाढल्यास त्यासाठी लागणारा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवावा, असे शासनाचे आदेश असून त्यानूसार ऑक्सिजन टँक पुर्ण क्षमतेने भरुन ठेवावेत. त्याचबरोबर ऑक्सिजन टँकची योग्यरितीने हाताळणी व्हावी यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. रुग्णालयात सध्या सुरु असलेली कामे संबधित यंत्रणांकडून तातडीने पुर्ण करुन घेण्यात यावीत. कोरोना वार्डमधील ऑक्सिजन पॉईट, व्हेंटीलेटर मशिन्स तसेच इतर अनुषंगिक साहित्य बेडच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात यावे. त्याचबरोबर कोरोना वॉर्ड, ऑक्सिजन प्लाँट, कोरोना बाल रुग्ण विभाग, पुरुष वॉर्ड विभाग, स्त्री कोरोना वॉर्ड या ठिकाणी असणारे किरकोळ काम बांधकाम विभागाने पूर्ण करुन घ्यावे, असे आदेशही त्यांनी त्यावेळी दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.