Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी ज्येष्ठ व ‍दिव्यांग नागरिकांची डिसेंबर अखेर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी ज्येष्ठ व ‍दिव्यांग नागरिकांची डिसेंबर अखेर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 3,  : जिल्ह्यातील ज्येष्ठ व वयोवृध्द नागरिकांना वयोश्री व एडीआयपी योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी योजनानिहाय यादी तयार करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांची नोंदणी करा. नोंदणी करत असताना एकही पात्र व गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता घ्या. नोंदणीसाठी संग्राम, महाईसेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस केंद्र या सर्व ठिकाणी कॅंम्प लावा. ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही अशांचे ग्रामसेवक व आशा वर्कर्स यांच्या मार्फत अर्ज संकलित करावेत असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनीही ऑनलाईन, वॉक इन, कँम्प यापैकी कोणत्याही सुलभ व सोयीच्या मार्गाने ३१ डिसेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

वय वर्षे ६० व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत तर दिव्यांग नागरिकांसाठी एडीआयपी योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांचे वाटप करण्यात येते. ३ डिसेंबर या दिव्यांग दिनाचे औचित्य साधून या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर सर्व गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांमधील कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांची अत्यंत आग्रही भूमिका असून नोंदणी करत असताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एआयडीपी व वयोश्री या योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे, उत्पनाचा दाखला याबाबत समाज कल्याण विभागाने पात्र लाभार्थी कोण, आवश्यक कागदपत्रे, कोणाशी संपर्क करावा या सर्व बाबतच्या  माहितीसाठी सुस्पष्ठ परिपत्रक काढावे. डिसेंबर अखेर पर्यंत सर्व पात्र लाभार्थींची नोंदणी व्हावी. यासाठी गटविकास अधिकारी यांनी सुक्ष्म नियोजन करावे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. सुलभतेसाठी तसेच काही अडचणी आल्यास त्यासंबंधात निराकरणासाठी समाजकल्याण विभागाने हेल्पलाईन नंबर सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केंद्राच्या कृत्रिम अवयव निर्मिती मंडळाकडे (ॲलिम्को) व्यक्तीश: मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केल्याचेही अधोरेखित केले.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‍जितेंद्र डुडी म्हणाले, सन २०१८ साली सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांचा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये जवळपास ३८ हजार दिव्यांग जिल्ह्यात असल्याचे आढळून आले आहे. या याद्या सहाय्यभूत धरून तसेच ज्यांची त्यावेळी नोंदणी झाली नाही असे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे आवश्यक साधनांसाठी फॉर्म भरून घेण्यात यावेत आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची निश्चिती करण्यात यावी. डिसेंबर अखेरपूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे. दर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता व्हीसीव्दारे झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी ॲलिम्कोच्या https://www.alimco.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व फॉर्म भरून द्यावा. अर्ज नोंदणी करताना जो क्रमांक प्राप्त होईल तो सांभाळून ठेवावा. ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया शक्य नसेल त्यांनी आशा वर्कर्स, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे व आवश्यक असलेले साहित्य नमूद करावे.

दिव्यांगाकरिता असणाऱ्या एडीआयपी योजनेसाठी  दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पनाचा दाखला (तहसिल/तलाठी/नगरसेवक), दोन पासपोर्ट आकाराचे फोटो कागदपत्रे आवश्यक आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांकरिता असणाऱ्या वयोश्री योजनेकरिता आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पनाचा दाखला (तहसिल/तलाठी/नगरसेवक), दोन पासपोर्ट आकाराचे फोटो कागदपत्रे आवश्यक आहेत.

या दोन्ही योजना वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार रूपयांपेक्षा कमी किंवा मासिक उत्पन्न 15 हजार रूपयांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी वैध आहेत.

ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही अशांनी कागदपत्रांच्या प्रती आशा वर्कर्स व ग्रामसेवक यांच्याकडे द्याव्यात. नोंदणी प्रक्रिया ३१ ‍डिसेंबर पर्यंत पूर्ण झाल्यानंतर मुल्यांकनांसाठी मोठ्या प्रमाणावर शिबीरे घेण्यात येणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.