Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेअर बाजारातील नोंदणीनंतर पेटीएमचे वाईट दिवस, तीन मोठ्या अधिकाऱ्यांचा राजीनामा

 शेअर बाजारातील नोंदणीनंतर पेटीएमचे वाईट दिवस, तीन मोठ्या अधिकाऱ्यांचा राजीनामा


नवी दिल्ली: देशातील प्रमुख डिजिटल पेमेंट कंपनी असलेली पेटीएम  सध्या मोठ्या संकटातून जाते आहे. पेटीएमला मोठा झटका बसला आहे. पेटीएमच्या तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

अलीकडेच शेअर बाजारात नोंदणी झालेल्या या आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स कंपनीच्या फायनान्शियल सर्व्हिसेस व्यवसायाला या तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी टाटा केला आहे. पेटीएममधून राजीनामा देणारे हे तीन अधिकारी आहेत पेटीएम पेमेंट्स बॅंकेचे सीओओ अभिषेक अरुण, ऑफलाइन पेमेंट्सच्या सीओओ रेणू सत्ती आणि वरिष्ठ उपाध्यक्ष आणि लेंडिंग सीओओ अभिषेक गुप्ता. 

पेटीएमसोबत २००६ पासून कार्यरत

समोर आलेल्या माहितीनुसार पेटीएम पेमेंट्स बॅंकेचे सीओओ अभिषेक अरुण यांनी जवळपास एक आठवड्यापूर्वी आपल्या LinkedIn अकाउंटवर लिहिले होते की त्यांनी पेटीएमबरोबर ६ वर्षे पूर्ण केल्यानंतर कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक अरुण यांच्या व्यतिरिक्त रेणु सत्ती यांनीदेखील राजीनामा दिला आहे. त्या पेटीएमबरोबर २००६ पासूनच कार्यरत होत्या. कंपनीच्या वाटचालीत आणि विस्तारात त्यांचा मोठा वाटा होता.

अभिषेक गुप्ता नोटिस पिरियडवर

अभिषेक गुप्ता मागील वर्षीच वरिष्ठ उपाध्यक्ष आणि लेंडिंगचे सीओओ झाले होते. अभिषेक पेटीएमबरोबर दीर्घकाळ नव्हते मात्र त्यांनीदेखील आता राजीनामा दिला आहे. सध्या ते पेटीएममधील आपला नोटिस पिरियड पूर्ण करत आहेत. आपल्या तीन मोठ्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम अद्याप कोणतेही स्टेटमेंट किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.


कंपनीचे अध्यक्ष अमित नैयर यांनीदेखील आधीच सोडली पेटीएम

शेअर बाजारात कमकुवत लिस्टिंग झाल्यानतर पेटीएम मोठ्या संकटांना तोंड देते आहे. मागील दोन वर्षात अनेक बडे अधिकारी पेटीएम सोडून गेल्याची माहिती समोर येते आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील सर्वात मोठ आयपीओ आणणाऱ्या पेटीएममधून आयपीओच्या काही काळ आधीच अमित नैयर यांनीदेखील राजीनामा दिला होता. ते अध्यक्षपदावर कार्यरत होते. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीच्या महसूलात ६४ टक्के वाढ होत तो १,०९० कोटी रुपयांवर पोचला आहे.

पेटीएम ही आज देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात कंपनीने मोठा विस्तार केला आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा सध्या चर्चेत आहेत. पेटीएमने नोव्हेंबर २०२१ मध्ये आपला आयपीओ बाजारात आणला होता. म्हणजेच पेटीएमची नोंदणी शेअर बाजारात झाली आहे. हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ होता. पेटीएम आयपीओच्या  माध्यमातून तब्बल १८,००० कोटी रुपयांची उभारणी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट होते. पेटीएम आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय युपीआय अॅप आहे. डिजिटल व्यवहार , पैशांची देवाणघेवाण, बुकिंग, इतर डिजिटल सेवा यासाठी पेटीएम ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र ही लोकप्रिय कंपनी सुरू करून यशाच्या शिखरावर पोचणाऱ्या विजय शेखर शर्मा यांनी कहाणी खास आहे. विजय शेखर शर्मा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहेत. तिथून सुरूवात करून त्यांनी आज पेटीएमसारखी यशस्वी कंपनी उभारून दाखवली आहे. सध्या पेटीएमचा शेअर १,३६८.०० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. बाजारात नोंदणी होताच पेटीएमचा शेअर गडगडला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.