स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या बोधचिन्हाच्या स्टँडीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते उद्घाटन
सांगली, दि. 1, : देशभरात सद्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या बोधचिन्हाची स्टँडी तयार करण्यात आली आहे. या स्टँडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती सहायक रणजित पवार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या लोगोची स्टँडी अत्यंत आकर्षक झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामित्त शासनाने प्रकाशित केलेले बोधचिन्ह सर्व शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावावे. हा महोत्सव अधिक व्यापकपणे साजरा करण्यासाठी नवनविन संकल्पना व उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, संकल्पक व्यक्ती यांचा सहभाग घ्यावा.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्जेदार आरोग्य, पर्यटन संधी, युवा शक्ती, सामाजीक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, माझी वसुंधरा, अर्थ साक्षरता, रोजगार निर्मीती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, सांस्कृतिक निर्देशांक वाढ या विषयांवर प्राधान्याने वैविध्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. याबरोबरच स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हेरीटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, चर्चासर्त्रे, परिसंवाद, प्रदर्शने, मेळावे, लोककला, अभिजात कला, निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून लोकसहभागातून महोत्सवी वातावरण निर्माण करावे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेली व्यक्तीमत्वे, वारसा स्थळे अशा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.