एवढ्या भारतीयांनी गेल्या पाच वर्षांत केला नागरिकत्वाचा त्याग
नवी दिल्ली: एकीकडे इतर शेजारी देशातील नागरिकांना सीएएच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असताना दुसरीकडे तब्बल ६ लाखांहून जास्त भारतीयांनी गेल्या ५ वर्षांत आपल्या नागरिकात्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली. यासंदर्भातील चर्चा संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा या भारतीयांनी त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राय यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, १ लाख ३३ हजार भारतीयांनी २०१७मध्ये आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. हाच आकडा २०१८मध्ये १ लाख ३४ हजार झाला. तो वाढून २०१९मध्ये १ लाख ४४ हजारपर्यंत गेला. २०२०मध्ये कोरोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध, निरनिराळ्या देशांमध्ये लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर हा आकडा खाली घसरून थेट ८५ हजार २४८ पर्यंत आला. तर २०२१मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा १ लाख ११ हजार एवढा झाला आहे. आजपर्यंतची आकडेवारी पाहाता एकूण १ कोटी ३३ लाख ८३ हजार ७१८ भारतीय नागरिक विदेशात स्थायिक झाल्याची माहिती राय यांनी या उत्तरात दिली आहे.
एकीकडे लाखांमध्ये नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची संख्या असली, तरी भारतीयत्वाचा स्वीकार केलेल्या नागरिकांची आकडेवारी देखील राय यांनी दिली. यामध्ये २०१६ ते २०२० या पाच वर्षांमध्ये एकूण ४ हजार १७७ विदेशी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहेत. भारतीय नागरिकत्वासाठी एकूण १० हजार ६४५ व्यक्तींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी सर्वाधिक पाकिस्तान (७७८२), त्याखालोखाल अफगाणिस्तान (७९५), अमेरिका (२२७), श्रीलंका (२०५), बांगलादेश (१८४), नेपाळ (१६७) आणि केनिया (१८५) या देशातून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज आले होते.
सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार नियमावली जारी झाल्यानंतर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असे राय यांनी सांगितलं. भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुसंख्य देशांमधील हिंदु, शिख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन यांना सीएएनुसार भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.