सांगलीच्या 'मिनी जिप्सी' बनवणाऱ्या रॅन्चोची आनंद महिंद्रांकडून दखल, दत्तात्रय लोहारांना बोलेरोची ऑफर
सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकी साहित्याच्या पार्टचे जुगाड करत छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडीची बांधणी केली आहे.
शिवाय ही चारचाकी सध्या गावातील रस्त्यावर, हायवेवर देखील सुसाटपणे धावत आहे. त्यामुळे ही चारचाकी गाडी सध्या सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या गाडीचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलं असून त्यांनी या बदल्यात बोलेरी गाडी देण्याची तयारी दर्शवली आहे. आनंद महिंद्रा यांच्याकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत सात लाखांहून जास्त लोकांनी पाहिले आहे.
आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओला आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करताना लिहिले की, हे वाहन कोणत्याही नियमानुसार नाही. परंतु, मी लोकांची कमीत जास्त करण्याच्या अशा प्रवृत्तीला नेहमी शेअर करीत राहिल. वाहनांप्रती त्यांची उत्सुकता खरंच जबरदस्त आहे, असे महिंद्रा यांनी म्हटलं आहे.त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, स्थानिक अधिकारी लवकरच या वाहनावर बंदी आणतील. कारण हे नियमांचं उल्लंघन आहे. व्यक्तिगत मी या बदल्यात बोलेरो द्यायला तयार आहे. कारण असे प्रयोग आपल्याला प्रेरित करतात. दत्तात्रय यांच्या या शोधाला आम्ही MahindraResearchValley मध्ये प्रदर्शित करु, असंही त्यांनी म्हटलं आहे.
देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची छोटीशी पण युनिक चार चाकी
भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकीतील पार्टचा वापर करुन देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडी बनवली आहे. एका हाताने अपंग आणि अशिक्षित असलेल्या लोहार यांनी ही मिनी जिप्सी मुलासाठी, कुटुंबासाठी बनवली. या गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्र या मिनी जिप्सीची चर्चा सुरु झाली. ही गाडी स्टार्टरने नव्हे तर पायाने किक मारून चालू होते. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते. तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे. या गाडीची मागची चाके ही स्कुटीची आहेत तर पुढची रिक्षाची आहेत. तीन-चार जण अगदी ऐटीत बसून जाण्यासारखी ही भन्नाट गाडी रस्त्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दत्तात्रय यांची ही मिनी जिप्सी बनण्यामागे त्यांच्या पत्नीची देखील मोठी मदत आहे. दत्तात्रय याची मुलगी आणि मुलगा देखील ही गाडी बिनधास्तपणे चालवतात. दत्तात्रय लोहार यांच्या फॅब्रिकेशनच्या माध्यमातून अनेक वस्तू बनवल्या आहेत. नेहमी ते नावीन्यपूर्ण गोष्ट बनवतात. चार चाकी आणि मिनी जिप्सी मात्र त्याची सध्या हिट झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.