सुदृढ आरोग्यासाठी तंबाखू व तंबखुजन्य पदार्थांचे सेवन टाळा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे
सांगली, दि. 22, : तंबाखूचे सेवन हे कॅन्सर सारख्या रोगाला निमंत्रण देणार आहे. तंबाखुपासून मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत तंबाखु मुक्ती समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. तरी जनतेने सुदृढ आरोग्यासाठी तंबाखू व तंबखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एन. टी. सी. पी. जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी आर. जी. टोणे, अन्न सुरक्षा अधिकारी यन्नवीर स्वामी, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, उदयराजे भोसले, रविंद्र कांबळै, ज्योती राजमाने, किशोर डोंबे आदि समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, तंबाखू मुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबरोबरच कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या ठिकाणी अंमलबजावणी पथकांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य् व संबंधित विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे, असे सांगून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर, कवठेमहांकाळ व ग्रामीण रुग्णालय शिराळा, विटा, पलूस, आटपाडी, कडेगाव व तासगाव या 8 ठिकाणी तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्त 446 शैक्षणिक संस्था तर 194 आरोग्य संस्था प्रगतीपथावर आहेत. तसेच टी.सी.सी. मध्ये नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या 400 आहे. शालेय कार्यक्रमांतर्गत शासकीय/निमशासकीय / खाजगी शाळा/ महाविद्यालये शैक्षणिक संस्था यांच्या 100 यार्ड परिसरामध्ये यलो लाईन कॅम्पेन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. संबंधित यंत्रणांनी तंबाखू नियंत्रण ही संकल्पना गावपातळीवरील शेवटच्या घटकापर्यंत रूजवून गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.