Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्राचार्य एस.डी.आकोळे अमृतमहोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

प्राचार्य एस.डी.आकोळे अमृतमहोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न



सांगली 26 : प्राचार्य एस.डी. आकोळे हे लठ्ठे शिक्षण संस्थेत समाजशास्त्राचे अध्यापक होते. त्यांनी समाजशास्त्र विषयात असंख्य विद्यार्थी घडविले. दक्षिण भारत जैन सभा, पदवीधर संघटना, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी इ. संस्थेत सेवाभावी वृत्तीने पाच दशके काम केले. अत्यंत संवेदनशील, दयाळू, अंत:करणाचा मार्गदर्शक म्हणून त्यांना आम्ही मानतो असे गौरवोद्गार आज भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी काढले. ते प्राचार्य आकोळे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सांगली येथे राजमती भवनमध्ये पदवीधर संघटनेने आयोजित केलेल्या प्राचार्य एस.डी. आकोळे अमृतमहोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बेल्लारी येथील विजयनगर श्रीकृष्ण देवराय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धू अलगूर होते.

यावेळी स्वागताध्यक्ष सुरेश पाटील यांनी आकोळे सरांचा गुणगौरव केला. अत्यंत प्रामाणिक, दिलेले काम निष्ठेने करणारा, अत्यंत शांत स्वभावाचा, सर्वांना बरोबर घेवून जाणारा, कामामध्ये झोकून देणारा, ल.ए. सोसायटीचा अत्यंत सच्चा सेवक म्हणून गेली 45/50 वर्षे काम करीत आहेत. निवृत्तीनंतरदेखील ल.ए. सोसायटी तसेच दक्षिण भारत जैन सभा व पदवीधर संघटना यात त्यांचे काम अव्याहतपणे चालू आहे. त्यांच्यावर ल.ए. सोसायटीने बेडकिहाळ येथील मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर येथील घोडावत कन्या महाविद्यालय, लठ्ठे प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत परीक्षा मंडळ आदींचे काम अत्ंयत प्रामाणिकपणे व झोकून देऊन केले आहे. त्यांच्यासारखा सेवक आज संस्थेला लाभला. दक्षिण भारत जैन सभेच्या पदवीधर संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा (श्री.आर.पी.पाटील अकॅडमी) मार्गदर्शन केंद्राचे काम अत्यंत जिद्दीने, सर्व सुविधांनी युक्त उभे करण्यामध्ये  त्यांचे योगदान प्रा. ए.ए.मुडलगी सरांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. असा एक समाजासाठी झटणारा कशाचीही तमा न बाळगणार्‍या व्यक्तीने 75 वर्षे पूर्ण केल्याने त्यांचा यथोचित सत्कार झाला पाहिजे या जिद्दीने शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च पदावर असणार्‍या व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्याचे उद्दिष्ट ठेवून मी स्वागताध्यक्ष पद स्वीकारले. आज त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आज या कार्यक्रमास मा. आवाडेदादा वयाच्या 92 व्या वर्षी उपस्थित आहेत हा ह्या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू आहे, असे विचार स्वागताध्यक्ष सुरेश पाटील यांनी मांडले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.ए.मुडलगी यांनी सत्कार करणेचा उद्देश सविस्तर विशद केला. त्यांनी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्यंत अद्यावत अशा श्री. आर.पी. पाटील स्पर्धा परीक्षा केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. गेली 30 वर्षे आकोळे सरांना बरोबर घेऊन काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा स्वभाव व कार्याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले. कशाची अपेक्षा न करता काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव. अशा व्यक्तीचा सत्कार करणेचा निर्णय घेऊन त्यांना सत्कार स्वीकारणेची विनंती केली. त्यांनी संकलित होणारा सर्व निधी पदवीधर संघटनेच्या कामासाठी वापरणार असाल तर हा सत्कार मी स्वीकारेन असे सांगितले. त्यानंतर आम्ही निधी संकलन करण्याचा निर्णय घेवून त्याचे योग्य नियोजन केले व गेल्या 20-25 दिवसात रु.9 लाखांचा निधी व 2 लाख रुपये जाहिरातीच्या रूपाने संकलित करण्यात यश मिळाले तसेच चार कारखान्यांकडे निधी मिळावा म्हणून संपर्क साधला आहे. हा संकलित होणारा निधी जैन समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणार्‍या गरीब विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची आर्थिक मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी आवाडेदादा उपस्थित होते. दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि. पाटील, ल.ए. सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ आण्णा कांते तसेच हुबळी येथील द.भा.जैन सभेचे व्हा. चेअरमन दत्ता डोर्ले, प्रा.डॉ.आर.बी.पाटील, प्रा.ए.एम.पहाडे (मनोगत वाचन) यांची आकोळे सरांच्याबद्दल गुणगौरवपूर्ण भाषणे झाली.

सत्कारमूर्ती आकोळेसर यांनी सत्काराबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. मी ज्या ज्या संस्थेत काम केले तेथे सर्वांच्या सहकार्यामुळे मी ते करू शकलो. माझ्या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. हे महत्त्वाचे होय, अशा भावना व्यक्त केल्या. मी आता माझ्या सत्कारानिमित्त जमलेल्या रु.9 लाख निधीमध्ये माझा रु.50 हजारांचा खारीचा वाटा घालून तो पदवीधर संघटनेच्या कार्यास प्रदान करीत आहे.

डॉ. माणिकराव साळुंखे यांनी भाषणा सुरूवात करताना आकोळे सर हे डॉ. विलास संगवे यांचे विद्यार्थी होते. विद्यापीठातील माझे सहकारी प्रा.आर.बी.पाटील हे त्यांचे विद्यार्थी असल्याने मी सुद्धा आकोळे सरांचा विद्यार्थी आहे. माझे सर्व मित्र जैन समाजाशी संबंधित होते. मी कुलगुरू झाल्यानंतर - भ. महावीर अध्यासनाचा प्रस्ताव प्रा. डी. ए. पाटील यांच्यामार्फत आला. तो मान्य करण्यात मला धन्यता वाटली. मला पूज्यश्री तरूणसागर महाराजांचा तसेच आचार्य विद्यासागर महाराजांचाही आशीर्वाद मिळाला आहे.  सरांच्या कामाची दखल घेवून आज त्यांचा सत्कार करीत आहात. या सत्कारामुळे मिळालेल्या ऊर्जेमुळे ते आणखी पुढील 20-25 वर्षे सेवा देतील असे वाटते. नोकर्‍यांची अवस्था फार कठीण आहे. त्यासाठी फक्त नोकरीसाठी मार्गदर्शन न करता विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये देण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल, असे भावपूर्ण विचार त्यांनी मांडले.

यावेळी डॉ. सिद्धू अलगूर, कुलगुरू विजयनगर श्री कृष्ण देवराय युनिव्हर्सिटी, बेल्लारी यांनी आकोळे सरांचे कौतुक करून अत्यंत प्रामाणिकपणाने समाजासाठी चांगल्यात चांगले देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे म्हणाले. आकोळे सरांचे काम हे माजी समाजसेवक गोपालकृष्ण गोखले यांच्यासारखे आहे.असे गोखल्यांच्या जीवनातील एक कथा सांगून स्पष्ट केले. प्रामाणिकपणा हा कोणत्याही गोष्टीतील यशाचा गमक आहे. त्यामुळे आकोळे सर शांत, प्रामाणिक व अत्यंत जिद्दीने व चिकाटीने काम करणारे प्राचार्य असल्याने ते जीवनात यशस्वी झाले आहेत. प्राचार्य सुकुमार दादा आकोळे यांच्यासारखी सरळ सज्जन व्यक्ती मिळणे कठीण, शैक्षणिक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्राध्यापक वृत्ती ही सर्वात श्रेष्ठ वृत्ती आहे. त्या वृत्तीने त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. आकोळे सर हे शिक्षक असल्याने त्यांना समाजाकडून सर्व सन्मान मिळणे योग्य आहे. आकोळे सर हे ग्रेट टीचर आहेत, असे गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा.ए.ए.मासुले यांनी अतिथींचा ओघवत्या भाषेमध्ये परिचय करून दिला. प्रा.डी.डी.मंडपे यांनी सन्मानपत्राचे प्रभावीपणे वाचन केले तर सचिव श्री. सुकुमार बेळके यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. जयपाल चौगुले व प्रा. एम. के. घुमाई यांनी नियोजनबध्द सूत्रसंचालन करून सोहळ्याची उंची वाढविली. सोहळ्यास महाराष्ट्र व कर्नाटकातील सरांच्यावर प्रेम करणार्‍या व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होत्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.