महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं.
मुंबई: करोना विषाणूचा नवा अवतार 'ओमायक्रॉन' आढळून आल्यापासून जगभरातील बाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. भारतात देखील ओमायक्रॉनचे बाधित सापडले असल्याने चिंतेत भर पडली आहे.
एकीकडे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असतानाच रुग्णसंख्येचा मंदावलेला आकडा पुन्हा एकदा उसळी घेऊ लागला आहे.
देशातील अनेक राज्यांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केलेत. महाराष्टात देखील राज्य सरकारने काही निर्बंध लादण्यात आलेत. मात्र नागरिक करोनासंबंधित सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. अशातच आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, वेळ पडल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाऊ शकतो असं स्पष्ट केलं.
करोनाच्या वाढीला हातभार लावू नका
यावेळी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, 'तज्ज्ञांच्या अंदाजानुसार करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून तसं दिसतही आहे. त्यामुळे सरकारने जरी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करायचं असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणं टाळावं आणि करोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.' असं स्पष्ट केलं.
काही ठिकाणी गर्दी होत असून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लागू शकतात का?
दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लागू शकतात का? असा प्रश्न वळसे पाटील यांना विचारण्यात आला असता त्यांनी, 'सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचं पालन झालं नाही आणि उद्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाउनपर्यंत जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या मनात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय़ घ्यावा लागेल' असे स्पष्ट सांगितले.
नवीन वर्षासाठी राज्य सरकारच्या सूचना
- रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
- 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागता करिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के, तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी राहणार आहे.
- या कार्यक्रमांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
-करोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळा.
- 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
-फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.