Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट; भेटीबाबत नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

 आज ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट; भेटीबाबत नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती


नवी दिल्ली 01  : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी  अनेक राज्यांत पक्षाचे पाय बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तृणमूलने त्रिपुरात प्रचाराचा वेग वाढवला आहे, तर गोवा आणि उत्तर प्रदेशात पक्षाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत . 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. या अनुषंगाने त्यांची शरद पवारांसोबतची  भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील. जेव्हा मलिक यांना विचारण्यात आलं की टीएमसी या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे का?


तेव्हा त्यांनी सांगितलं की तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्यप्राय काम आहे. राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीचे वर्णन सामान्य भेटीसारखं केलं असलं तरी तृणमूलने भाजपला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

अलीकडे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभी आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवा राजकीय खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांवर निशाणा साधत पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूलने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे म्हटले होते. ते म्हणाले की सर्वप्रथम टीएमसीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा चेहरा उघड करावा अशी आमची इच्छा आहे. मग विरोधी पक्षाने ममता बॅनर्जींना विरोधी चेहरा म्हणून स्वीकारायचे की नाही हे ठरवू.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.